Headlines

पिंपळगाव पेठेत श्री सायंबा महाराजांची यात्रा उत्साहात:‘श्री सायंबा महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला




सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून श्रद्धा असलेल्या श्री सायंबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त परिसरातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत गेली. ‘श्री सायंबा महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. श्री सायंबा महाराजांना नवस बोलल्यानंतर तो पूर्ण झाल्याच्या श्रद्धेतून अनेक भाविक यात्रेदरम्यान तगतरावांच्या माध्यमातून नवस फेडतात. त्यामुळे यंदाच्या यात्रेतही तगतरावांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी पारंपरिक पद्धतीने नवस फेडत महाराजांचे दर्शन घेतले. सकाळपासून रात्रीपर्यंत मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ सुरू होती. यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच श्री सायंबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महिलांसह पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही दर्शनासाठी मोठी उपस्थिती नोंदवली. भाविकांनी, पूजा-अर्चा करून महाराजांचे दर्शन घेतले. अनेक कुटुंबांनी यात्रेनिमित्त देवस्थान परिसरात धार्मिक विधी करून नवसपूर्ती केली. यात्रेमुळे पिंपळगाव पेठ गावाला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी व मनोरंजनाची साधने यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. लहान मुलांसह महिला व कुटुंबांनी यात्रेचा आनंद घेतला. परिसरातील रस्त्यांवरही भाविकांची मोठी वर्दळ दिसून आली. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, मंदिर परिसरातील सुरक्षितता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस व प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलिसांच्या नियोजनामुळे यात्रेचा उत्सव शांततेत पार पडण्यास मदत झाली. श्री सायंबा महाराजांच्या यात्रेला पिंपळगाव पेठसह परिसरातील गावांमधून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम घडविणारा हा यात्रोत्सव भाविकांच्या उत्साहामुळे अविस्मरणीय ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *