Headlines

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:18 बळी नंतर CIDची एंट्री; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त




पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या दोन दिवसांत 18 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात 12 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागात 6 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय अनेक नागरिकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून फुगेवाडीतील आणखी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध अड्ड्यांवर सुमारे 2700 रुपये प्रति कॅन दराने विकली जात होती. मात्र अधिक नफा कमावण्यासाठी त्याने ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल दारूमध्ये मिसळून त्याचे प्रमाण वाढवले. याच घातक मिश्रणामुळे अनेक नागरिकांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग केला आहे. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध दारूच्या नेटवर्कचा शोध सुरू केला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये पसरलेल्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून दारू तयार करणारे, पुरवठा करणारे आणि विक्री करणारे सर्व संबंधित आरोपी तपासाच्या रडारवर आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर पोलिस प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दापोडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केले आहे. तपास पथकाच्या प्रमुखांसह आणखी 4 अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे शहरात हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकलगर आणि पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. विषारी दारू कुठे तयार झाली, त्यामागे कोणते लोक आहेत आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती याचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय प्रयत्न सुरू असून या मृत्यूकांडातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला एक प्रकारची हत्या, असल्याचे म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *