Headlines

पुणे महापालिका भरती घोटाळा:बनावट नियुक्तीपत्रांनी 45 लाखांची फसवणूक, जेजुरी देवस्थान विश्वस्तासह इतरांवर गुन्हा दाखल




पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांच्यासह महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शलाका विनायक ढोणे (वय ४७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी अनेक बेरोजगार युवक-युवतींकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. त्यानंतर महापालिकेचे बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट नियुक्तीपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवले. तक्रारीनुसार, उमेदवारांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे रक्कम स्वीकारण्यात आली. अनेकांना नियुक्ती निश्चित झाल्याचे सांगून विश्वासात घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नियुक्ती न झाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. या घोटाळ्यात केवळ ४५ लाख रुपयांची फसवणूकच नव्हे, तर शासकीय कागदपत्रांची बनावट निर्मिती करून त्यांचा वापर केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, बँक व्यवहार आणि संबंधित पुराव्यांची तपासणी सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामुळे महापालिकेच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात नाव आलेले जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण स्वतः या प्रकरणातील तक्रारदार असून अनेक पीडितांना पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महापालिकेची नियुक्तीपत्रे, बदली आदेश, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, स्वाक्षऱ्या किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खेडेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण आर्थिक व्यवहार, बँक खाते, कॉल रेकॉर्ड व डिजिटल पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करून खरे दोषी समोर आणावेत. तसेच, आपली बदनामी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *