![]()
पुणे: ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. के. जैन यांना पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे यांच्या वतीने स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ॲड. जैन यांनी शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या मजबूत असले तरी नैतिकतेशी तडजोड करू नये, असे आवाहन केले. ॲड. जैन म्हणाले की, शिक्षण संस्था चालवताना पैसा कितीही मिळू शकतो, परंतु आपण किती लोकांचे जीवन घडवणार की बिघडवणार याचा विचार करायला हवा. शिक्षण संस्था चालवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, या वृत्तीला आळा घातला नाही, तर समाजाचे भविष्य चांगले होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपयांचा धनादेश, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असे होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ॲड. एस. के. जैन यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, उपमहापौर परशुराम वाडेकर, संस्थेचे अध्यक्ष महादेव माने, उपाध्यक्ष डॉ. कल्याण वाघ, खजिनदार संजय लोंढे, मानद सचिव संदीप घोलप यांच्यासह संचालक मंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. ॲड. जैन यांनी शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, शिक्षक हे शैक्षणिक संस्थांचे केवळ नोकर नाहीत. शिक्षण संस्थेने शिक्षकांसाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक बनावे. संस्थेचा प्रमुख घटक शिक्षक असल्याने त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे. शिक्षकांना नोकरीसाठी मुलाखतींना जावे लागणे ही वेदनादायी बाब आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) खरोखर गरज आहे का, याचाही विचार व्हायला हवा. शिक्षकांना समाजात सन्मानाने काम करता आले पाहिजे, कारण शिक्षकांचा मान जोपर्यंत राहील, तोपर्यंत समाज योग्य मार्गावर राहील, असेही जैन यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले की, जगातील सर्वोत्तम अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्या दारात आणून ठेवला आहे. या धोरणामुळे प्रथमच शिक्षण क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय काम झाले आहे. खाजगी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य महत्त्वाचे आहे. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन उपयोग नाही. जग झपाट्याने बदलत आहे आणि त्या बदलांनुसार आपणही स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तुम्ही कसे शिकाल आणि कसे शिकवाल, याला आज विशेष महत्त्व आहे. उद्याच्या गरजांनुसार तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देत असाल, तरच त्याला खरे महत्त्व आहे. कारण आजच्या काळात स्पर्धा मोठी आहे.
Source link
ॲड. एस. के. जैन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान:शिक्षण संस्थांनी नैतिकतेशी तडजोड करू नये, शिक्षकांचा सन्मान महत्त्वाचा – ॲड. जैन