Headlines

प्रवीण तरडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार:साठे वंचित, कष्टकरी घटकांचा आवाज: तरडे यांचे प्रतिपादन




पुण्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती दिनानिमित्त महाचर्चा व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामगार सुरक्षा दल, झोपडपट्टी सुरक्षा दल आणि पथारी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साहित्य, समाजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक योगदानाचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अरुण म्हात्रे, अभ्यासक डॉ. सुनील भंडगे, विचारवंत प्रा. अस्मा शेख आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट उपस्थित होते. प्रवीण तरडे यांना शाल, श्रीफळ, पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त, सामाजिक कार्यासाठी राज देशमुख आणि कवयित्री पंचवटी गोंडाळे यांनाही विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रवीण तरडे म्हणाले की, “अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाजातील वंचित, कष्टकरी आणि दुर्लक्षित घटकांचा आवाज होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे. माझ्या कलाकृतींमधून समाजातील वास्तव मांडण्याचा मी कायम प्रयत्न केला असून, हा सन्मान पुढील वाटचालीसाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.” ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मराठी साहित्याला समृद्ध करणारे अमूल्य योगदान दिले. त्यांच्या लेखणीतून श्रमिक, वंचित, दलित, स्त्रिया आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले गेले. पाटील यांनी अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आणि प्रत्येक घरात त्यांची पुस्तके वाचली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. भगवानराव वैराट यांनी अण्णा भाऊ साठे यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, साहित्य, कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. समाजातील कष्टकरी, वंचित आणि दुर्बळ घटकांसाठी काम करणे हीच अण्णा भाऊंना खरी आदरांजली ठरेल. यावेळी ‘मराठी समीक्षकांना अण्णा भाऊंच्या साहित्याचा आवाका पकडता आला का?’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. विविध मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ उलगडून सांगितला. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *