Headlines

सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय:गरज नसताना दिवे, पंखे, एसी सुरू; राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान




अमरावती शहरातील अनेक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणली असून, कर्मचारी संघटनांच्या काही पुढाऱ्यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिका यांसारख्या लोकाभिमुख कार्यालयांमध्ये ही परिस्थिती वारंवार दिसून येते. केवळ या तीन कार्यालयांपुरती मर्यादित नसून, इतरही अनेक कार्यालयांमध्ये गरज नसताना दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा (एसी) आणि संगणक तासनतास सुरू ठेवले जातात. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असून, यामुळे दरमहा मोठ्या रकमेचे वीजबिल विनाकारण भरावे लागते. हा केवळ आर्थिक भुर्दंड नसून, देशाच्या मौल्यवान राष्ट्रीय संपत्तीचेही मोठे नुकसान आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या डीपीसीच्या बैठकीदरम्यान असेच एक ताजे उदाहरण समोर आले. बैठकीसाठी अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. पहिल्या मजल्यावरील सभागृहात बैठक सुरू असताना, वरच्या माळ्यावरील अनेक कार्यालयांमधील कर्मचारी बैठकीत उपस्थित असूनही तेथील विजेची उपकरणे सुरूच होती. अनेक कार्यालयांमध्ये दिवसा पुरेसा नैसर्गिक प्रकाश उपलब्ध असतानाही केबिन आणि सभागृहांमध्ये विनाकारण मोठे दिवे लावले जातात. दुपारच्या जेवणाची सुटी किंवा बैठका संपल्यानंतरही संबंधित कक्षातील पंखे आणि एसी चालूच राहतात. कामाची वेळ संपून कर्मचारी घरी गेल्यानंतरही काही कार्यालयांमध्ये दिवे सुरू असल्याचे आढळून आले आहे. ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संसाधने खर्च होत असल्याने, वीज वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कार्यालयातील प्रमुखांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, काम संपताच उपकरणे बंद करण्याबाबत कर्मचाऱ्यांना कडक सूचना देणे आवश्यक आहे. ‘वीज बचत हीच वीज निर्मिती’ या सूत्राचा अवलंब करून सर्वांनी जबाबदारीने वागल्यास हा अपव्यय थांबवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *