![]()
पुण्याच्या महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या ई-मेलमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस दल सतर्क झाले असून, संबंधित परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील ठिकाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या धमकीमध्ये आयईडी बॉम्बस्फोटाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, हा घातपात घडवून आणण्यासाठी काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संशयास्पद संदर्भ या ई-मेलमध्ये देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपास सुरू धमकीचा हा ई-मेल मिळताच पुणे पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग तात्काळ सतर्क झाले आहेत. हा ई-मेल कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला, तो खरा आहे की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी पाठवलेला बनावट ई-मेल आहे, याची तांत्रिक तपासणी सायबर विभागाकडून वेगाने केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील इतर संवेदनशील परिसरात सुरक्षा आणि गस्त वाढवण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कसून तपासणीमध्ये संबंधित परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आलेले नाही. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
Source link
पुणे महापौर कार्यालय उडवून देऊ:ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवली, पोलिसांचे गस्त