![]()
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण येथे एका कंटेनरमधून १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मद्यासह वाहन आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मद्याची किंमत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये आहे, तर वाहनाची किंमत १५ लाख रुपये आहे. कंटेनरची तपासणी केली असता, त्यात गोवा राज्यात निर्मित ‘रॉयल सिलेक्ट डीलक्स व्हिस्की’ या ब्रँडचे १,२०० बॉक्स आढळून आले. हे मद्य मध्य प्रदेशात निर्मित व विक्रीसाठी असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून आणले जात होते. एकूण १० हजार ३६८ ब. लि. (१८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्या) मद्य जप्त करण्यात आले. मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना चालकाकडे नव्हता. त्याने कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस आणि इतर खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. प्राथमिक तपासात सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद आणि बनावट असल्याचे निदर्शनास आले. या गुन्ह्यात वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, ते बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्यांविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा ०२०-२६९१७३२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.
Source link
पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई:1.35 कोटींचा बनावट मद्यसाठा जप्त, कंटेनर चालकाला अटक