Headlines

पुणे येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण:सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले, आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड




पुणे येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून हे केंद्र साकारले आहे. या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही येतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत असून, या माध्यमातून राज्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी फाउंडेशनच्या या सार्वजनिक-खाजगी भागीदारी उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध उपचार विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *