Headlines

पुणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण झालेल्या बालिकेची 16 तासांत सुटका:बंडगार्डन पोलिसांची कारवाई, तीन आरोपी जेरबंद




पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवानी अमोल भोसले (वय २१, व्यवसाय: मजुरी, रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) यांचे त्यांच्या पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे त्या ३० मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपली एक वर्षाची मुलगी ‘लिला’ हिच्यासह पुणे रेल्वे स्टेशन येथे आल्या होत्या. पुण्यात राहण्यासाठी दुसरी जागा नसल्याने आणि कोणतेही नातेवाईक नसल्याने, त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील रिझर्वेशन कार्यालयाशेजारी असलेल्या दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला. रात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली असता, मुलगी लिला शेजारी दिसली नाही. रेल्वे स्टेशन परिसरात सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) नुसार तात्काळ तपास सुरू केला. अपहरण झालेल्या बालिकेचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाच्या तीन विशेष टीम तयार केल्या. या पथकाने ३० मे रोजी रात्री १० वाजेपासून ते ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सलग १२ तास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील तब्बल ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या फुटेजमध्ये एक संशयित महिला आणि पुरुष बालिकेला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या ‘पनवेल-नांदेड-पनवेल’ एक्सप्रेसमध्ये बसत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या महत्त्वपूर्ण धाग्यादोऱ्याच्या आधारे बंडगार्डन पोलिसांनी तात्काळ एक पथक दौंड रेल्वे स्टेशनकडे आणि दुसरे पथक कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनकडे रवाना केले. दौंड रेल्वे स्टेशन येथे शोध घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत चौगुले, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकडे यांच्या पथकाला संशयित आरोपी द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (वय ३५), राधा लकी आदिवासी (वय २०) आणि लकी संदिप आदिवासी (वय २१) (सर्व रा. सुंदरनगर, जालना) आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून बालिकेला पळवून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *