Headlines

पुण्यात टिंबर मार्केटमधील 60 दुकाने आगीत जळाली:27 अग्निशमन वाहनांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली; 150 जवानांचे शर्थीचे प्रयत्न, जीवितहानी नाही




पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागून ५० ते ६० हून अधिक दुकानांना आगीची झळ बसली. जय वल्लभ शाळेजवळ लाकूड व लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची दुकाने असलेल्या परिसरात मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी ही आग लागली. लाकडाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलासह पुणे कॅन्टोन्मेंट आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एकूण २७ अग्निशमन वाहनांच्या साहाय्याने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात आला. आगीच्या ठिकाणाशेजारीच रहिवासी वसाहत असल्याने आग घरांपर्यंत पोहोचू नये, यासाठी जवानांनी विशेष खबरदारी घेतली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. या मोहिमेत मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, प्रमोद सोनावणे, कमलेश चौधरी, कैलास शिंदे, निलेश महाजन यांच्यासह सुमारे दहा अधिकारी आणि १५० जवान सहभागी झाले होते. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गुरम आणि त्यांची टीमही घटनास्थळी दाखल झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. या घटनेत ५० ते ६० हून अधिक दुकानांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नुकसानीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारणही समजू शकले नाही. पोलिस दल, १०८ रुग्णवाहिका सेवा, महावितरण, महापालिकेचा वाहन विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्याला सहकार्य केले. आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *