Headlines

पैठण येथील शासकीय वस्तुसंग्रहालय कायापालटासाठी 1.75 कोटींची मंजुरी:सातवाहनकालीन वैभवास येणार नवसंजीवनी‎




संत एकनाथ महाराजांची पावन कर्मभूमी, गोदावरीचा पवित्र तीर आणि सातवाहन राजवंशाची ऐतिहासिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवाला आता खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळणार आहे. येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात असलेल्या बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या दालनांचे संपूर्ण नूतनीकरण करणे आणि एक अत्याधुनिक नवीन दालन उभारणे या कामासाठी शासनाने १ कोटी ७५ लाख ४५ हजार ११६ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पैठणच्या वैभवशाली इतिहासाचे आणि अमूल्य वारशाचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केली आहे. १९९५ मध्ये या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यामुळे या संग्रहालयातील प्रदर्शनी दालने कालौघात अत्यंत जीर्ण झाली होती. कीटक आणि वाळवीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक दुर्मीळ पुरावस्तू, प्राचीन शिल्पे आणि ऐतिहासिक दस्तऐवज धोक्यात आले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याचे सुरक्षित जतन करणे आणि त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रदर्शन मांडणे संग्रहालय प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत होते. यामुळेच या संग्रहालयाच्या संपूर्ण आधुनिकीकरणाची आणि दुरुस्तीची मागणी इतिहासप्रेमी, संशोधक आणि स्थानिक नागरिकांकडून अनेक वर्षांपासून सातत्यााने केली जात होती. अखेर राज्य शासनाने या गंभीर समस्येची दखल घेत नूतनीकरणाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. नूतनीकरण प्रक्रियेत संग्रहालयशास्त्राच्या मानकांचा आणि निकषांचा काटेकोर वापर केला जाणार आहे. संग्रहालयात उपलब्ध असलेले पुरातत्त्वीय अवशेष, सातवाहनकालीन व मध्ययुगीन शिल्पे, प्राचीन नाणी, शिलालेख आणि अत्यंत दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू आता अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि आकर्षक मांडणीच्या सहाय्याने पर्यटकांसमोर मांडल्या जातील. यामुळे इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना पैठणचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास अधिक प्रभावीपणे, रंजकतेने आणि जिवंतपणे अनुभवता येणार आहे. कामे शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे निर्देश या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांना मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सर्व कामे दर्जेदार आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या कामासाठी लागणारा आवश्यक निधी २०२६-२७ च्या चालू अर्थसंकल्पातील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या विशेष तरतुदीमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे. संत एकनाथ महाराजांचे भव्य मंदिर, विस्तीर्ण गोदावरी तीर आणि जगप्रसिद्ध पैठणी वस्त्रपरंपरा यामुळे येथे वर्षभर भाविक आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *