Headlines

प्रवीण पोटे यांचे नामांकन पुढे ढकलले:महायुतीचे सर्व उमेदवार 1 जून रोजी अर्ज भरणार




अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचे नामांकन पुढे ढकलण्यात आले आहे. आता ते १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पोटे आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, परंतु ऐनवेळी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. महायुतीचे राज्यभरातील सर्व उमेदवार आगामी सोमवार, १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे माझाही उमेदवारी अर्ज १ जूनलाच दाखल केला जाईल, असे पोटे यांनी सांगितले. पालकमंत्र्यांचा आजचा अमरावती दौराही रद्द करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुक्रवारच्या दौरा कार्यक्रमामध्ये दुपारी १२ वाजता पोटे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याला उपस्थिती, असा उल्लेख होता. यासाठी संपूर्ण तयारीही करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी पहाटे पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोटे यांचे नामांकनही पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा पक्ष पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी, भाजपच्या केंद्रीय संसदीय निवड मंडळाकडून शुक्रवारी सकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती. १७ पैकी दोन जागांचा तिढा कायम राहिल्याने यादी प्रलंबित होती. पक्षाकडून यादीच जाहीर झाली नसताना उमेदवारी अर्ज कसा दाखल करायचा, हा प्रश्न निर्माण झाल्याने पालकमंत्र्यांचा दौरा आणि पोटे यांची उमेदवारी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. पोटे यांनी यापूर्वी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, त्यांनी भाजपचे महानगर अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तेच या मतदारसंघाचे प्रबळ दावेदार असतील, असे संकेत मिळाले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी ८ उमेदवारांसाठी १७ अर्जांची उचल करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रवीण पोटे, शिवसेना शिंदे गटाचे गोपीकिशन बाजोरिया व त्यांचे पुत्र विप्लव बाजोरिया आणि युवा स्वाभिमान पार्टीचे विनोद गुहे यांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांत एकूण ४४ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली होती. आजच्या १७ अर्जांमुळे एकूण संख्या ६१ वर पोहोचली आहे. गुरुवार, २८ मे रोजी निवडणूक विभागाला ईदची सुटी होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *