![]()
चंदननगर पोलिसांनी दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तावरे याने एका तक्रारदाराकडून कुक्कटपालन व्यवसायासाठी ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या पत्नीचे मंगळसूत्र एका कार्यक्रमासाठी वापरण्याच्या बहाण्याने घेतले. हे मंगळसूत्र त्याने एका वित्तीय संस्थेत गहाण ठेवून फसवणूक केली. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तावरेने अशाच प्रकारे आणखी तिघांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तावरे दोन वर्षांपासून फरारी होता. त्याने आपले मोबाईल क्रमांक आणि बँक खाती बदलली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे चंदननगर पोलिसांना तो नवी मुंबईतील सानपाडा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सानपाडा परिसरातून त्याला अटक केली. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख, सहायक निरीक्षक महेश लामखेडे, गणेश जगदाळे, किरण घुटे आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत सायबर चोरट्यांनी तिघांची २५ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने हडपसरमधील काळेपडळ भागात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय तक्रारदाराची सायबर चोरट्यांनी नऊ लाख २३ हजारांची फसवणूक केली. याबाबत एकाने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत. अशाच पद्धतीने मुकुंदनगर भागातील एकाची सायबर चोरट्यांनी नऊ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास भारमळ तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची सहा ७१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका तरुणाने मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Source link
फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद:दोन वर्षांपासून होता फरार, चार जणांची केली होती फसवणूक