![]()
उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर अत्याचार करून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात फुलंब्री पोलिसांनी २४ तासांच्या आत कारवाई केली आहे. याप्रकरणी डॉ. रामदास महादू तरटे (५४) आणि भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम भागाजी ढोके (५४) या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेने २० ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकमध्ये डोकेदुखीच्या उपचारासाठी दिलेल्या गोळ्यांमुळे गुंगीच्या अवस्थेत असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करून बदनामी करण्यात आली. या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक डॉ. सोनाली पाईकराव, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, अंमलदार अनिल शिंदे, दिनकर पांढरे व कौतिक चव्हाण यांनी ही कारवाई पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे करत आहेत. तपासादरम्यान घटनेशी संबंधित पुरावे, डिजिटल स्वरूपातील माहिती आणि इतर आनुषंगिक बाबींची नियमानुसार पडताळणी करण्यात येत आहे.
Source link
फुलंब्रीमध्ये रुग्ण महिलेवर अत्याचार; डॉक्टरसह भाजप शहराध्यक्षाला अटक:घटनेचा व्हिडिओ बनवून प्रसारित केल्याने बदनामी