Headlines

बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीचे उत्तम उदाहरण:पालकमंत्री विखे यांनी केले बचतगटांचे कौतुक, नारीशक्ती अधिवेशनाचे उद्घाटन‎




महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग हा केवळ गरज नसून सहकाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक शिस्त आणि व्यवहाराचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. या बचतगटांना सहकार क्षेत्राशी जोडून महिलांना अधिक संधी दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. सहकार भारतीच्यावतीने शिर्डी येथे आयोजित दोन दिवसीय ‘नारीशक्ती आणि सहकारिता अधिवेशनाचे’ उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रेवती शेंदूर्णीकर, प्रदेशाध्यक्ष दत्ताराम चावके, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली आवाडे, महामंत्री विवेक जुगादे, संघटनमंत्री संजय पाचपोर, उपाध्यक्ष रवी बोरावके आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका दिवसेंदिवस वाढत आहे. शेती, उद्योग, बँकिंग, तंत्रज्ञान यांसह सहकार क्षेत्रातही महिलांमध्ये प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी मोठी आर्थिक उलाढाल उभी केली आहे. बचतगटांना सहकाराच्या मुख्य प्रवाहात आणल्यास ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल. महिलांच्या बचतगटांना दिलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात आर्थिक शिस्त अधिक मजबूत करायची असेल तर महिलांना नेतृत्वाच्या संधी अधिक व्यापकपणे दिल्या पाहिजेत. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार भारतीच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली आवाडे, महामंत्री विवेक जुगादे यांनीही मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. देशात तीन कोटी लखपती दीदी बनवणार राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. ‘सहकारातून समृद्धी’ हे ध्येय ठेवून केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी देशात तीन कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *