Headlines

महिनाभर संसार अन् नवरी निघाली 4 लेकरांची माय!‎:चार लाख रुपये रोख घेऊन मुंबईतील तरुणीचा राहुरीतील तरुणाशी विवाह‎




लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून चिंताक्रांत झालेल्या राहुरी तालुक्यातील एका तरुणाची नवरी शोधण्याच्या नादात तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईच्या एका महिला एजंटने दाखवलेल्या नवरीशी मोठ्या उत्साहात लग्न लावून दिले खरे, पण महिनाभरानंतर कळाले नववधु आधीच विवाहित असून तिला चार मुलेही आहेत. तिचे पितळ उघडे पडताच नवरदेवासह कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली! राहुरी तालुक्यातील एका गावातील तरुणाला लग्नासाठी मुलगी हवी होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत मुंबईतील एका महिला एजंटने त्याला मुंबईची तरुणी दाखवली आणि लग्नाच्या नावाखाली तब्बल ४ लाख रुपये रोख मोजून घेतले. महिनाभरापूर्वी थाटामाटात लग्न झाले. नवरी मुलगी महिनाभर कशीबशी सासरी राहिली. मात्र, तिच्या रोजच्या संशयास्पद हालचाली आणि दारू-गुटख्याच्या व्यसनामुळे संशय बळावला. नातेवाईकांनी खातरजमा केली असता, ती तरुणी आधीच विवाहित असून तिला चार मुले असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. परंतु शनिवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सध्या राज्यात मुलांचे विवाह जमण्यात येणाऱ्या अडचणींचा गैरफायदा घेऊन अशा ‘मॅरेज रॅकेट’ टोळ्या सक्रिय झाल्या असून, पोलिसांनी अशा ठगांवर कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत. ‘माझा अन् ४ पोरांचा सांभाळ करा!’ फसवणूक उघडकीस आल्यानंतर नवरदेवाने जाब विचारला असता, “आता माझा आणि माझ्या चार मुलांचा सांभाळ करा,’ अशी अजब मागणी या लुटारू नवरीने लावून धरली. आपली भयंकर फजिती आणि आर्थिक लूट झाल्याचे लक्षात येताच नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी गनिमी काव्याने नवरी मुलगी आणि तिच्या साथीदारांना जाळ्यात पकडले अन् थेट पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पण गुन्हा दाखल झाला नव्हता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *