.

खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ‘ट्रिगर १’ लागू झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया गावपातळीवर सुरू झाल्याचे चित्र असले, तरी प्रत्यक्ष बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या नोंदणीचे प्रमाण मात्र अत्यंत कमी असल्याचे २ ऑक्टोबर रोजीच्या अधिकृत पंचनामा अहवालातून ही बाब समोर येते.
जिल्ह्यातील एकूण १,६१० गावांपैकी १,५५२ गावांत पंचनामे सुरू करण्यात आली, हे प्रमाण तब्बल ९६.४० टक्के इतके आहे. वरकरणी हा आकडा पाहता जिल्ह्यातील पंचनामा प्रक्रियेला वेग आल्याचे दिसते. मात्र, याच अहवालातील अन्य दोन निकषांकडे पाहिल्यास चित्र पूर्णपणे बदलते. एकूण बाधित क्षेत्रापैकी प्रत्यक्ष पंचनामा पूर्ण झालेल्या क्षेत्राचे प्रमाण केवळ १७.४५ टक्के असून, बाधित खातेदार शेतकऱ्यांच्या नोंदणीचे प्रमाणही जेमतेम २०.३० टक्के इतकेच आहे. याचाच सरळ अर्थ, जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी व ८२ टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त क्षेत्र अद्याप अधिकृत नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण १०.२० लाख हेक्टरवरील पेरणी क्षेत्र आणि ११.५५ लाख खातेदार या “ट्रिगर १’ अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत.
जामखेड तालुक्यात खातेदार नोंदणीचे प्रमाण ३९.०१ टक्के असून, हे जिल्ह्यातील सर्वाधिक आहे. याउलट, राहुरी (२१.०८%), कर्जत (१५.९५%), श्रीगोंदा (११.८७%) यांसारख्या तालुक्यांत हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. गावपातळीवर जवळपास सर्वच तालुक्यांत १०० टक्के पंचनामे पूर्ण दाखवले जात असताना, प्रत्यक्ष शेतकरीनिहाय नोंदणीत इतकी मोठी तफावत का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
^ सध्या सुरू असलेले शेतीचे पंचनामे व शेतकरीनिहाय नुकसानीचे पंचनामे यात गल्लत करू नये. दुष्काळ संहितेप्रमाणे काही प्रमाणात प्रत्यक्षात पंचनामे करून माहिती संकलित करणे अपेक्षित असते. त्यासाठी हे पंचनामे सुरू आहेत. रिमोटद्वारे पंचनामे झाल्यानंतरचा अहवाल आल्यानंतरच “ट्रिगर-२’ लागू होईल. यात शेतकरी वगळले जाऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. – अजित नवले, शेतकरी नेते.