![]()
शहराच्या उशाशी जायकवाडी जलाशय असतानाही, जुन्या पैठण शहरातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा वनवास संपताना दिसत नाही. नवनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊनही ते सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन २०१८ मध्ये झाले होते. २०२० मध्ये टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये टाकीची चाचणी पार पडली व वाढीव पाइपलाइनच्या कामाला सुरुवात झाली. ही टाकी भरण्यासाठी जायकवाडी येथून नवीन भरणा पाइपलाइन टाकून दोन ते अडीच वर्षे उलटली आहेत. तरीही ठेकेदार व प्रशासनाच्या कारभारामुळे नवनाथ मंदिर परिसरातील नागरिक अद्यापही पाण्यासाठी व्याकुळ आहेत. याबाबत नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांनी सांगितले की, पाण्याची टाकी भरण्यासाठी लागणारे भरणा लाइनचे व्हॉल्व्ह आणि नागरिकांच्या नळ कनेक्शनसाठी लागणाऱ्या पाइपचे व्हॉल्व्ह लावण्यासाठी दोन ते अडीच वर्षे घालवणे अयोग्य आहे. फक्त एस्टिमेट वाढवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. ठेकेदार पाईप उपलब्ध नसल्याचे, कामगार नसल्याचे किंवा बिल न मिळाल्याचे कारण सांगून चालढकल करत आहे. अशा ठेकेदारावर कडक कारवाई झाली पाहिजे. समस्या मार्गी लावणार ठेकेदार अर्जुन अग्रवाल म्हणाले, तीन-चार दिवसांत काम पूर्ण होईल. तर पाणीपुरवठा अभियंता युवराज हलमारे यांनी सांगितले की, नवनाथ मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीसाठी पाईप उपलब्ध झाले आहेत. लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीद्वारे पाणीपुरवठा सुरू करून परिसरातील नागरिकांची समस्या सोडवली जाईल.
Source link
जुन्या पैठणमध्ये नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय:जलकुंभाचे काम पूर्ण होऊनदेखील चालू करण्यास टाळाटाळ