.

दिवाळीचा आनंद केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरासोबत साजरा करण्याची परंपरा बडनेऱ्यात आजही कायम आहे. तब्बल ८८ वर्षांपासून सुरू असलेल्या नरकासुर दहन सोहळ्यामुळे बडनेऱ्यातील दिवाळीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
जुन्या वस्तीतील सावता मैदानावर सोमवारी रात्री ५१ फुटांच्या नरकासुर प्रतिमेचे दहन केले. आ. रवी राणा यांच्या हस्ते दहन होताच उपस्थित नागरिकांनी जल्लोष केला. त्यानंतर झालेल्या सामूहिक आतषबाजीने परिसर उजळून निघाला. आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी मुलांसह महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बडनेरा आणि परिसरातील नागरिक या सोहळ्याला ‘गोरगरिबांची दिवाळी’ म्हणून ओळखतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात होणाऱ्या या कार्यक्रमाची नागरिक आतुरतेने वाट पाहतात. यंदाही सावता मैदानावर नागरिकांची मोठी उपस्थिती होती. नरकासुराचे दहन आणि त्यानंतर होणारी सामूहिक आतषबाजी हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. बडनेऱ्यासह आसपासच्या गावांमधील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
सावता युवक मंडळाच्या पुढाकारातून सार्वजनिक श्रीराम विजय महोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बडनेऱ्यातील ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू असून, आजही तिचा उत्साह तेवढाच कायम आहे. नरकासुर दहनासाठी प्रतिमा उभारली होती. प्रतिमेच्या दहनानंतर झालेल्या आतषबाजीने कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, जयंत डेहनकर, नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, रंजना डोंगरे, किशोर पवार, विनायक ढोले, सुजय पवार आणि श्रीकांत येते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गौरव बांते यांनी केले. पोलिस निरीक्षक पूनित कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
नरकासुराची प्रतिमा तयार करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सुमारे १५ दिवस आधीपासून तयारीला लागतात. प्रतिमा उभारणे, तिची सजावट आणि दहनाची तयारी यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात. यंदा ५१ फूट उंच नरकासुराची प्रतिमा तयार करण्यात आली होती. रात्री दहनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच सावता मैदानावर नागरिकांची गर्दी जमली होती. दहनाचा क्षण जवळ येताच शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली.