Headlines

बाबा आढावांच्या प्रेरणेतून कामगारांच्या‎अडचणी सोडवण्याचे काम सतत करणार‎:बार्शीत हमाल कामगारांच्या जिल्हा मेळाव्यात आमदार राजेंद्र राऊत यांची ग्वाही‎


.

ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. बाबा आढाव यांनी हमाल कामगारांसाठी मोठी चळवळ उभी केल्याने त्यांना न्याय मिळाला. डॉ. बाबा आढाव यांच्या प्रेरणेतूनच हमाल कामगारांच्या अडचणी सोडवण्याचे काम सातत्याने केले आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रेरणा घेऊन हमाल कामगारांच्या कायम पाठीशी राहणार असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. येथील हमाल-तोलार कामगारांच्या जिल्हा मेळाव्यात राऊत बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे होते.

या वेळी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी शासकीय धान्य गोदामातील कामगारांच्या सरळ वाहतुकीविषयी नाराजी व्यक्त करून तो प्रश्न आमदार राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात लोमटे यांनी राज्यातील व देशातील हमाल कामगारांच्या प्रश्नांबाबत विद्यमान सरकारवर नाराजी व्यक्त करून कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस आप्पा खताळ, संघटक गोरख मेंगडे, बार्शी बाजार समितीचे सभापती विजय गरड यांनी भाषण केले. प्रास्ताविकात शिवाजीराव शिंदे यांनी बार्शी येथील हमाल कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी आमदार राऊत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहा एकर जमीन उपलब्ध करून दिल्याने आभार केले. मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे संचालक व सचिव, महामंडळाचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातील हमाल-तोलार, शासकीय धान्य गोदाम कामगार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख जगताप, माजी उपाध्यक्ष ताजुद्दीन शेख, संचालक गजेंद्र मुकटे, बार्शीचे उपाध्यक्ष उदय नेटके, दिगंबर भोसले, चंद्रकांत मांजरे, प्रकाश ठोंगे यांच्यासह बार्शी आडत बाजार हमाल संघ व वैराग येथील हमाल कामगारांनी परिश्रम घेतले.

या वेळी आमदार राऊत म्हणाले, वडील राष्ट्रसेवादलात होते व आढाव व पन्नालाल सुराणा यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे. येथील हमाल कामगारांना घरकुलासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्याचे भूमिपूजनही स्व. आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. काही तांत्रिक अडचणींमुळे त्या जागेचा प्रश्न थांबला आहे. परंतु लवकरच मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री गोरे यांच्याशी चर्चा करून हमाल कामगारांच्या घराचा प्रश्नमार्गी लावण्यात येईल. कामगारांना हक्काचे छत मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *