Headlines

शहराच्या विकासाला तांत्रिक बळ देणाऱ्या अभियंत्यांचा गौरव:शहराच्या विकासात अभियंत्यांचा वाटा मोलाचा- महापाैर गाडे‎




रस्ते असोत की पाणीपुरवठा, पूल असो की जलनिस्सारण व्यवस्था… शहराच्या विकासाची प्रत्येक वीट तांत्रिक कौशल्याने रचणाऱ्या अहिल्यानगर महापालिकेतील अभियंत्यांचा अभियंता दिनानिमित्त गौरव करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर ज्योती गाडे व आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते अभियंत्यांचा सत्कार झाला. महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, “शहराचा विकास केवळ मोठ्या घोषणा करून होत नाही, तर त्यामागे अभियंत्यांचे नियोजन, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण मेहनत असते. महापालिकेत अभियंत्यांची संख्या कमी असतानाही उपलब्ध अभियंते विविध नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अभियंत्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. आयुक्त यशवंत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा दाखला देत अभियंत्यांनी नियोजन व गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असे सांगितले. एआय, डिजिटल प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शहराच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच शाश्वत प्रकल्प उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले, अभियंते रात्रंदिवस जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन, बदलते हवामान आणि नागरी समस्यांवर अभियांत्रिकीच्या माध्यमातून शाश्वत उपाय शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक मनोज दुल्लम, महेश लोंढे, पुष्कर कुलकर्णी, रोहन सानप यांच्यासह महापालिका अभियंते उपस्थित होते. माजी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी मनोगत व्यक्त केले. शहराच्या विकासामागील ‘टेक्निकल टीम’चा सन्मान मनोज पारखे, सुरेश इथापे, श्रीकांत निंबाळकर, वैभव जोशी, अश्विनी जाधव, जितेंद्र शेळके, खलील पठाण, आदित्य बल्लाळ, गणेश गाडळकर, अंजली गदादे, भक्ती बेल्हेकर, निकिता गोरे, राजेंद्र मेहत्रे, सुजित कोके, रामदास साळी, निलेश पेटेकर, शुभम पवार, सर्वार्थ मुदगल, राहुल गीते, प्रदीप ढगे व अनिकेत केकाण आदी अभियंत्यांचा गौरव करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *