![]()
पिशोर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने पिशोर पोलिस ठाण्यातर्फे वाहतूक जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक शाखेच्या समन्वयाने आयोजित या उपक्रमात परिसरातील विविध शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वीतील बालचित्रकारांनी ‘वाहतूक नियम पाळूया, अपघात टाळूया’ आणि ‘हेल्मेट आणि सीट बेल्ट हे जीवनाचे सुरक्षा कवच’ या विषयांवर अप्रतिम चित्रे साकारत रस्ते सुरक्षेचा प्रभावी संदेश दिला. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, समता माध्यमिक विद्यालय, मथुरामाता माध्यमिक विद्यालय, तसेच चिंचोली लिंबाजी आणि नाचनवेल येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी म्हणाले, “वाहतुकीचे नियम हे केवळ दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नसून स्वतःसह इतरांचेही अमूल्य जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. हीच जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासून रुजावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतून निवडलेली २३ उत्कृष्ट चित्रे जिल्हा पातळीवर पाठवली जाणार असून, ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ही चित्रे पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाहतूक शाखेत सादर केली जातील. निवडक चित्रांचे पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्ट कॉरिडॉरमध्ये महिनाभर प्रदर्शन भरवले जाणार आहे. पिशोर ठाण्यामार्फत सहभागी प्रत्येक शाळेतील तीन विजेत्यांना तसेच जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट बालचित्रकारांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. पिशोर पोलिसांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.
Source link
बालचित्रकारांच्या कुंचल्यातून उमटला रस्ता सुरक्षेसह जागृतीचा अनोखा संदेश:पिशोर पोलिसांच्या उपक्रमामध्ये 300 विद्यार्थ्यांचा सहभाग