![]()
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर गीताबन कला महोत्सव आणि आमदार प्रशांत बंब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘श्यामरंग-गोकुळात रंगली गवळण’ या भक्तिसंगीत व गवळण गीतगायनाच्या कार्यक्रमाने लासूर स्टेशन येथील श्रीकृष्ण कॉलनीतील कृष्ण मंदिर परिसर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला. कृष्णनामाचा अखंड गजर, सुरेल भक्तिगीतांचे स्वर आणि रंगलेल्या गवळणींच्या सादरीकरणाला उपस्थित हजारो भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त येथील कृष्ण मंदिरात दरवर्षी पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताहाचे भक्तिभावाने आयोजन केले जाते. या सप्ताहात भाविकांसाठी भक्तिसंगीताचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची आगळीवेगळी परंपरा जपली गेली आहे. याच परंपरेचा भाग असलेल्या ‘श्यामरंग’ या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही या कार्यक्रमाला लासूर स्टेशन परिसरातील भाविक व ग्रामस्थांचा तुफान प्रतिसाद लाभला. या सुरेल कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या विविध अजरामर भक्तिगीतांसह पारंपरिक गवळणी अत्यंत तन्मयतेने सादर करण्यात आल्या. यावेळी भाविकांची उपस्थिती होती. गोकुळातील कृष्णलीला, गोप-गोपींचे भावविश्व आणि बालकृष्णाच्या लीलांचे हुबेहूब वर्णन करणाऱ्या गीतांनी अवघा परिसर भारावून गेला होता. महिला भाविकांची प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आयोजनासाठी भगवान गाढे, नितीन गायकवाड, संदीप गायकवाड, मंदिर समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, पंचायत समिती सदस्य सुनील पाखरे, ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे आदींसह भाविक उपस्थित होते. लासूर स्टेशन परिसराला गोकुळाचेच दिव्य स्वरूप ः भाविकांचा मोठा सहभाग भक्तिगीत व गवळण गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध भक्तिसंगीताची परंपरा जपण्यासोबतच, आजच्या नव्या पिढीपर्यंत कृष्णभक्ती आणि लोककलेचा हा अनोखा वारसा पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील नयनरम्य विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आणि भक्तिस्वरांमुळे संपूर्ण लासूर स्टेशन परिसराला जणू प्रत्यक्ष गोकुळाचेच दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते.
Source link
श्रीकृष्ण जन्माष्टमी:‘श्यामरंग’च्या भक्तिस्वरांनी रंगले गोकुळ; गवळणींच्या मधुर सुरांनी भाविक मंत्रमुग्ध