Headlines

शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज- कृषी सचिव परिमल सिंह, फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन‎




शेतीमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘गटशेती’चा अवलंब करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी केले. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपले शिवार, आपली माणसं या विशेष उपक्रमांतर्गत फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी समृद्धी गट, वाणेगाव आणि जय मल्हार शेतकरी गट महाल किन्होळा येथील गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विभागीय सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी पठारे, आनंद गंजेवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ए. बी. पवार यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी सचिव परिमल सिंह म्हणाले की, “पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या एकत्र येण्यामुळे राज्यात जलसंधारण व मृदा संवर्धनाच्या कामांना मोठी गती मिळत आहे. शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक नवीन सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. जेव्हा शेतकरी एकत्र येऊन शेती करतात, तेव्हा बियाणे, खते आणि अवजारांची घाऊक दरात खरेदी शक्य होते. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते. तसेच शेतमालाचे एकत्रीकरण करून त्याची विक्री केल्याने बाजारात योग्य आणि चांगला भाव मिळवणे सोपे जाते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचन आणि सामायिक यंत्रसामग्रीचा अवलंब करून हवामान बदलाच्या सर्व आव्हानांवर मात करणे सहज शक्य होते, असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कृषी सचिवांकडून जल व मृदा संवर्धनाच्या विविध उपक्रमांचे केले कौतुक कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या जल व मृदा संवर्धनाच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमास वाणेगावच्या सरपंच अर्चना जाधव, तालुका कृषी अधिकारी पंकज वाकळे, कृषी सहाय्यक विठ्ठल गोराडे, मनीषा सूर्यवंशी यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटशेतीच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही एकत्र येऊन शेती करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *