![]()
तालुक्यातील वनोजा बाग येथे पाच महिन्यांच्या बालकाचे वजन अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आशा सेविकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे बालकाला वेळीच पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. अवघे ३ किलो २०० ग्रॅम वजन असलेल्या या बालकाची प्रकृती लक्षात घेऊन बालकाच्या आईला आवश्यक आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. बालकाला अधिक चांगल्या वैद्यकीय तपासणी व उपचारांची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. त्यामुळे बालकावर वेळेत उपचार सुरू होण्यास मदत झाली. अमरावती येथील जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी सेंटरमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा घराच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावात आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लसीकरण, बालकांचे नियमित वजन व आरोग्य तपासणी, गरोदर मातांची काळजी, जन्म-मृत्यू नोंदणी, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड तसेच विविध आजारांबाबत जनजागृती आणि मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आशा सेविका पार पाडतात. वनोजा बाग येथील या पाच महिन्यांच्या बालकाचे वजन अत्यंत कमी असल्याचे आशा सेविका मुक्ता वानखडे यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितेशकुमार जैस्वाल तसेच गटप्रवर्तिका संगीता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बालकाच्या घरी वेळोवेळी भेट देऊन प्रकृतीची माहिती घेतली. आशा सेविका ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. घराघरांत जाऊन बालकांचे आरोग्य, मातांची काळजी आणि विविध आरोग्यविषयक बाबींवर लक्ष ठेवण्याचे त्यांचे काम उपयुक्त ठरते. वनोजा बाग येथील या घटनेतही मुक्ता वानखडे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली असून, वेळीच उपचारासाठी रेफर केल्याने त्या बालकासाठी जीवनदायिनी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
Source link
तत्परतेमुळे देवदूत ठरली आशा सेविका:पाच महिन्यांच्या बाळाचे वजन अवघे 3 किलो 200 ग्रॅम; वेळेत उपचार