![]()
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नेमली आहे. तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून काही विद्यार्थी गटाकडून तन्मयचा मानसिक छळ करण्यात येत होता. ग्रामीण पार्श्वभूमीवरून त्याची वारंवार टिंगल-टवाळी केली जात असल्याने तन्मय प्रचंड मानसिक तणावाखाली होता. या छळामुळेच त्याने वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. १८ जुलै रोजी तन्मय नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगून वसतिगृहातून बाहेर पडला. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेत चढताना दिसून आला. लोणीकंद रेल्वे स्थानकानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. पोलीस तपासात २१ आणि २३ जुलै रोजी त्याच्या मोबाईलवरील इंटरनेट सेवा काही काळ सुरू झाल्याचे समोर आले; मात्र त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत बी. जे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने सहा सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. मात्र, चौकशीची प्रगती किंवा निष्कर्ष याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप तन्मयच्या वडिलांनी केला आहे. तसेच, इतर अनेक पालकांनीही त्यांच्या मुलांना महाविद्यालयात रॅगिंगचा त्रास होत असल्याची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुलाच्या बेपत्ता होण्यामुळे वंगे कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून तन्मयच्या आईची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. दरम्यान, बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगची ही पहिली घटना नाही. गेल्या वर्षी एका निवासी डॉक्टरच्या रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. तसेच, सिंबायोसिस विद्यापीठाचे प्रमुख शांताराम बळवंत मुजुमदार यांच्या नातवाच्या रॅगिंग प्रकरणानंतरही तीन निवासी डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती आणि अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष बारटक्के यांची बदली करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तन्मय वंगे प्रकरणामुळे महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Source link
बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता:रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा कुटुंबीयांचा आरोप, समिती स्थापन