![]()
राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आता ‘ईव्हीएम’ विरुद्ध ‘बॅलेट पेपर’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला असून, या भूमिकेला आता महाविकास आघाडीतूनही मोठे बळ मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सूचनेचे स्वागत केले असून, हा मुद्दा थेट दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकींवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज ठाकरे यांची हीच भूमिका राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचीदेखील याला मान्यता असल्याचे संजय राऊत म्हणालेत. ८ जूनला दिल्लीत चर्चा – सुप्रिया सुळे संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीत झालेल्या चर्चेबाबत माध्यम प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “राज ठाकरे यांनी दिलेली ही सूचना नक्कीच चांगली आणि विचार करण्यासारखी आहे, असे त्या म्हणाल्या. येत्या ८ जून रोजी दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत मी स्वतः हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरील सर्व नेत्यांसमोर प्रकर्षाने मांडणार असून, या बहिष्काराच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली जाईल,” असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ऐनवेळी माघार आणि ‘घोडेबाजारा’चे आरोप दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी अनपेक्षितपणे अर्ज मागे घेतल्याने अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या नाट्यमय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ झाला असल्याचा थेट आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. विरोधकांच्या नव्या रणनीतीकडे लक्ष दरम्यान, राज ठाकरे यांनी टाकलेली ही गुगली आता थेट दिल्ली इंडिया आघाडीच्या दरबारी पोहोचणार आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या देशपातळीवरील विरोधी पक्षांना आता ‘निवडणूक बहिष्कारा’चा हा नवीन पर्याय कितपत मानवतो आणि आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधक हे अस्त्र खरोखरच बाहेर काढणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Source link
बॅलेट पेपर नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकावा:राज ठाकरेंची सूचना, उबाठासह सुप्रिया सुळेंचाही पाठिंबा; 8 जूनला दिल्लीत खलबते