Headlines

भाजप आमदाराकडून अश्लील पूल पार्टीचे आयोजन:प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप, परिवहन मंत्र्यांनी व्हिडिओच दाखवला




मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून धुसपुसत असलेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी शांत झालेला हा वाद आता थेट ‘पाणी’ आणि ‘पूल पार्टी’वरून पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडल्याने संपूर्ण राज्यासह मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, आमदार नरेंद्र मेहता यांनी एका हाय-प्रोफाइल पूल पार्टीचे आयोजन केल्याचा गंभीर आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. सरनाईक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आमदार नरेंद्र मेहता यांच्या व्यापारी वृत्तीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. त्यांनी लिहिले, “आज संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण करत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे राज्यातील बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. आपल्या मिरा-भाईंदरमधील जनतेलाही पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा अत्यंत भीषण आणि संवेदनशील परिस्थितीत माझ्या मतदारसंघातील आमदार नरेंद्र मेहता यांनी ‘सेवन इलेव्हन क्लब’मध्ये एका अश्लील पूल पार्टीचे आयोजन केले आहे. रोम जळत असताना राजा नीरो फिडल (पावा) वाजवत होता, तशीच काहीशी ही परिस्थिती आहे. जनतेच्या डोळ्यात पाणी असताना या व्यापारी वृत्तीला नेमके काय म्हणावे?” सरनाईकांनी शेअर केलेल्या व्हिडिओत काय? परिवहन मंत्र्यांनी आपल्या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील जोडला आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका पंचतारांकित हॉटेलमधील असून, तिथल्या भव्य स्विमिंग पूलमध्ये एका मोठ्या पार्टीचे नियोजन करण्यात आल्याचे दिसत आहे. आगामी २७ जून रोजी दुपारी ४ वाजल्यापासून या पार्टीला सुरुवात होणार असून, यामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा डीजे प्लेयर सादरीकरण करणार असल्याचे व्हिडिओत सांगितले जात आहे. तसेच लोकांना या पार्टीसाठी बुकिंग करण्याचे आवाहनही केले जात आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये कुठेही थेट आमदार नरेंद्र मेहता किंवा इतर कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव अथवा फोटो दाखवण्यात आलेला नाही. मात्र, सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनीची या पार्टीचे आयोजन केल्याचा दावा केला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष ऐन पाणीटंचाईच्या काळात मिरा-भाईंदरमधील या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपल्याने स्थानिक प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही नागरिकांकडून यावर तीव्र आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी केलेल्या या गंभीर आणि थेट आरोपांवर आमदार नरेंद्र मेहता किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी २७ जूनच्या या कथित पार्टीपूर्वी मिरा-भाईंदरच्या राजकारणात कोणते नवे वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *