Headlines

भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात:52 कोटींच्या व्यवहारांमागे परदेशात पळून जाण्याचा कट उघड; 65 बनावट खात्यांतून उलाढाल




नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात तसेच पतसंस्थेतील संशयित व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेल्या नामकर्ण आवारे यांना सिन्नर सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारे यांच्या वकिलांनी पुढील पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉण्डरिंगच्या तपासात मोठी प्रगती झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अशोक खरातचा ताबा घेतला आहे. नाशिक पोलिसांकडून आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे पथक खरातला मुंबईतील पीएमएलए न्यायालयात हजर करणार आहे. मनी लॉण्डरिंग, बनावट बँक खाती आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीने त्याच्यावर स्वतंत्र गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, अटकेची शक्यता लक्षात येताच अशोक खरातने मोठा आर्थिक कट रचला होता. कोपरगाव येथील समता पतसंस्थेमध्ये 65 बनावट खाती उघडून केवळ चार दिवसांत 200 हून अधिक व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांमधून सुमारे 52 कोटी रुपये काढण्यात आल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि करचुकवेगिरी टाळण्यासाठी बँकिंग व्यवहारातील दोन लाखांच्या मर्यादेची पळवाट वापरण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या बनावट खात्यांमध्ये काही प्रतिष्ठित कुटुंबीयांसह महसूल आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या मते, या पैशांच्या आधारे अशोक खरात परदेशात पलायन करण्याच्या तयारीत होता. न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याचा त्याचा डाव असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. परदेशातील काही संपर्कांच्या मदतीने तो भारताबाहेर जाऊन पोलिसांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अटकेची चाहूल लागताच त्याने आर्थिक व्यवहारांना वेग दिला आणि बनावट खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम हलवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. परदेशात पलायनाच्या कटाबाबत माहिती समोर अशोक खरात गेल्या दोन महिन्यांपासून महिला लैंगिक अत्याचारासह विविध गंभीर प्रकरणांमध्ये कारावासात आहे. त्याच्याविरोधात पोलिस, ईडी आणि इतर तपास यंत्रणा समांतर चौकशी करत आहेत. आता ईडीच्या ताब्यानंतर या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग आणि परदेशात पलायनाच्या कटाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *