![]()
बडनेरा पोलिस स्टेशन हद्दीत शेतातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत बडनेरा ठाणेदारांना निवेदन सादर केले. गेल्या काही महिन्यांपासून शेतामधील मशिनरी, विद्युत पोलवरील केबल तसेच इतर मौल्यवान साहित्य चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य सातत्याने चोरीला जात असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. तसेच संशयित व्यक्ती परिसरात मोकाट फिरत असून त्यांच्यावर कोणताही वचक नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या वतीने रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविणे, संशयित इसमांवर बारकाईने लक्ष ठेवून चौकशी करणे, चोरीच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन आरोपींना अटक करणे, परिसरात पोलीस चौकी अथवा पोलीस बूथ उभारणे, नागरिक सुरक्षा समिती स्थापन करणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. तसेच अंजनगाव बारीसारख्या मोठ्या गावात अद्यापही पोलीस चौकी नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बडनेरा पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन शेतकरी व नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना भाजपा नेते रोशन पुनिया, मंडळ अध्यक्षा दीपाली मलवार, सरचिटणीस सोपान मुळे, प्रतीक पोकळे, निखिल पोकळे यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
Source link
मशिनरी, केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत:अंजनगाव बारी येथे पोलिस चौकीची करण्यात आली मागणी