![]()
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त सोमवारी ता. 2 जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी सहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर, अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची उपस्थिती होती. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून शेतकरी, महसूल वसुली, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक यंत्रणा अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या महसूल विभाग सांभाळत असतो. गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. वेळेत कामाचा निपटारा, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, महसूल विभाग हा नागरिकांशी थेट जोडलेला विभाग आहे. त्यामुळे काम करताना संवेदनशीलता, शिस्त आणि तत्परता असणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. डिजिटल युगात कामाची गती वाढवून नागरिकांना जलद आणि सुलभ सेवा देण्यावर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार हरिश्चंद्र गाडे, सखाराम मांडवगडे, जीवक कुमार कांबळे नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, सिताराम साळसुंदर, कर्मचारी अनिता कोलगणे, अनिल पाटील, शैलेश वाईकर, मंगला गोरे, वैशाली रंजवे, कैलास मठपती, अनिल पाथरकर, मंडळ अधिकारी आशा गीते, महसूल सहाय्यक रवींद्र मस्के, ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे, वाहन चालक मारुती शिरसाठ , कर्मचारी पवन यादव केशव फलटणकर, पोलिस पाटील तरन्नूम शेख यांचा सत्कार करण्यात आला.
Source link
महसूल दिनानिमित्त हिंगोलीत उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:लोकाभिमुख सेवेला प्राधान्य द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन