![]()
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याची मागणी केली आहे. आधुनिक समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ही मागणी करण्यात आली. ठाकरे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. यापूर्वी २०१७ मध्येही मुख्यमंत्री फडणवीस यांना असेच निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र, हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, फुलेप्रेमींचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अविनाश ठाकरे यांनी सांगितले. महात्मा फुले दांपत्याचे शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण आणि समतेसाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा सर्वोच्च बहुमान म्हणून त्यांना संयुक्त मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अविनाश ठाकरे हे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असण्यासोबतच ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आणि केंद्र सरकारच्या महात्मा फुले द्विशताब्दी महोत्सव उच्चस्तरीय समितीचे सदस्य आहेत.
Source link
महात्मा फुले दांपत्याला संयुक्त मरणोत्तर भारतरत्न द्या:अविनाश ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी