![]()
अमरावतीची अग्रणी महिला धनुर्धर, १७ वर्षीय कुमकुम अनिल मोहोडने जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवार, २ रोजी रिकर्व्ह सांघिक प्रकारात १० वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या दिग्गज दक्षिण कोरिया संघाला पराभूत करून भारताला पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. जुने धनुष्य नव्हे, तर रिकर्व्ह धनुष्याचे जुनेच हँडल वापरून कुमकुमने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध केला. कारण तिला या जुन्या हँडलची चांगलीच सवय झाली होती. अमरावतीच्या यशदीपने मिळवले रौप्य यशदीप संजय भोगेने रिकर्व्ह सांघिक प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या खेळाडूने अभ्यासात हुशार असतानाही खेळावरच लक्ष केंद्रित केले. दहावीत ८९ तसेच १२ वीत ८७ टक्के गुण असल्यामुळे थोरल्या भावाप्रमाणेच यशदीपनेही इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा असे वडील संजय यांना वाटत होते. मात्र, त्याने खेळात करिअर केले. पदकासाठी वडिलांसोबत लावलेली ई-बाइकची पैज कुमकुमने जिंकली आशियाई तिरंदाजी स्पर्धेत कुमकुमने सुवर्ण जिंकले. कुमकुमचे वडील अनिल मोहोड यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. ते म्हणाले, पोरीने कमालच केली. अपेक्षेपेक्षाही मोठे यश मिळवले. त्यामुळे तिला शहरात सरावास जाण्या-येण्यासाठी मी इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन देणार आहे. कारण, सध्या ती लहान आहे. दररोज मला तिला सकाळी व सायंकाळी सरावासाठी सोडायला जावे लागते. घ्यायलाही जावे लागते. बरे, इतर वाहनाने पाठवायचे म्हटले तर ५ हजारांवर खर्च येतो. तो झेपत नाही. त्यामुळे वडिलांनी तिच्यासोबत आशियाई स्पर्धेत पदक जिंकून दिल्यानंतर ई-बाइक घेऊन देण्याची शर्यत लावली होती. आता कुमकुमने पदक जिंकल्याने तिचे वडील तिला गाडी घेऊन देणार आहेत. तसेच, तिने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास तिला मी नव्हे तर तिचे प्रशिक्षक आयफोन घेऊन देणार आहेत, असे वडिलांनी स्पष्ट केले. तिच्या पदकानंतर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातून तिचे अभिनंदन होत आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून गाजतेय कुमकुम : कुमकुम अवघ्या १७ व्या वर्षी, अंकिता भकत आणि कीर्ती शर्मा यांच्यासह महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले होते. यासोबतच तिने धीरज बोम्मादेवरासह मिश्र प्रकारात रौप्य पदक देखील पटकावले. तिने शांघाय (चीन) आणि अंताल्या (तुर्की) येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली. तिने थेट बलाढ्य दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना पराभूत करत आपले कौशल्य सिद्ध केले होते. जुन्या हँडलला धनुष्याचे इतर भाग नवीन जोडले होते नव्या हँडलने तिला व्यवस्थित तिरंदाजी करता येत नव्हती. त्यामुळे तिने रिकर्व्ह धनुष्याचे इतर भाग नवीन वापरले. परंतु त्याला जुनेच हॅण्डल जोडले. त्यामुळे तिची कामगिरी प्रभावित झाल्याची माहिती अमरावती येथील खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी दिली. कुटुंबाने मर्यादित उत्पन्नातूनच महागड्या खेळाचा खर्च भागवला अमरावती शहरातील मणिबाई गुजराती विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या कुमकुम मोहोडची कौटुंबिक स्थिती सामान्य आहे. मात्र, अशा परिस्थितीतही तिच्या पालकांनी तिच्या स्वप्नांसाठी मोठा त्याग केला. कुमकुमचे वडील अनिल मनोहर मोहोड हे अमरावतीमध्ये मिठाईच्या दुकानांसाठी पुठ्ठ्याचे डबे बनवण्याचे काम करतात. या छोट्याशा व्यवसायातून मिळणाऱ्या अत्यंत मर्यादित उत्पन्नातून त्यांनी घर चालवले आणि कुमकुमचा खेळाचा खर्च भागवला. गृहिणी असलेली तिची आई रुपाली मोहोड यांनी २०१८ मध्ये कुमकुमची तिरंदाजीची आवड ओळखली व तिला या क्षेत्रात आणण्यासाठी आग्रह धरला. कुमकुम त्यांची एकुलती मुलगी आहे. जिद्द, प्रचंड मेहनत, शिस्तबद्ध सरावामुळे यशदीप चमकला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) छत्रपती संभाजीनगर केंद्रात प्रशिक्षण घेणारा तिरंदाज यशदीप भोगेने पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. धीरज बोम्मदेवरा व नीरज चौहानसह पदक जिंकले. यशदीपच्या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आहे. यशदीपने वयाच्या बाराव्या वर्षांपासून तिरंदाजीत पाऊल ठेवले. सुट्टीमध्ये तो उन्हाळी शिबिरात फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान त्याने तिरंदाजी खेळ पाहिला. उत्सुकतेपोटी त्याने धनुष्य हाती घेतले. त्याने मागे वळून न पाहता थेट भारतीय संघात स्थान मिळाले व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून देशाचे नाव उंचावले. सध्या तो भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहे. त्याला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारने गौरवले आहे.
Source link
महाराष्ट्राच्या कुमकुमने साधला सुवर्णवेध!:धनुष्याचे नवे हँडल जमले नाही, जुनेच वापरून मोक्याच्या क्षणी 10 पैकी 10 गुण मिळवले; यशदीपने मिळवले रौप्य