![]()
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) जिल्हा शाखेची बैठक गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोळमकर होते. नरेंद्र धर्माळे व लक्ष्मण तडस यांनी मार्गदर्शन केले.अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम गावागावात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना चमत्कार प्रशिक्षण देण्याचा निर्णय बैठकीत घेतला. तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखीचे प्रकार, फसवणुकीच्या पद्धती समजून घेऊन ते नागरिकांसमोर वैज्ञानिक पद्धतीने मांडण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.चिखलदरा व धारणी येथे शाखा बांधणी दौरा आयोजित करण्याचेही ठरले. मेळघाट परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचारांचा प्रसार वाढवण्यावर यावेळी भर दिला. अंबाजोगाई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीचा अहवाल या वेळी मांडला. जिल्हा, विविध शाखांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनी जिल्हा अहवाल सादर केला. प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी ‘अंनिस’च्या अंकाचे वर्गणीदार वाढवणे, अंकाचा प्रसार, संघटना बांधणीबाबत मार्गदर्शन केले. बडनेरा शाखेचा अहवाल बबिता वानखडे, दर्यापूरचा नरेंद्र धर्माळे, चांदूर रेल्वेचा पल्लवी ढोले, अमरावती शहर शाखेचा सचिन खोब्रागडे, चांदूर बाजार शाखेचा राहुल खंडारे, तर पुजदा शाखेचा प्रतिभा खापरे यांनी सादर केला. बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषद, चमत्कार प्रशिक्षण, लेखन-वाचन कार्यशाळा, विवेकवादी जनजागृती अभियान, विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याचे निश्चित केले. कार्यक्रमाचे संचालन मंजू वासनिक यांनी केले. आभार संदीप हिवराळे यांनी मानले, तर समन्वय आशिष देशमुख यांनी साधला. या वेळी जिल्हा, शहर व ग्रामीण शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
महाराष्ट्र ‘अंनिस’ची जिल्हा बैठकीत चर्चा:परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन , विवेकवादी विचारांचा प्रसार