![]()
हिंगोली जिल्ह्यात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आणि रीडिंग घेणाऱ्या खासगी कंपन्यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अवाच्या सव्वा वीजबिले येत आहेत. चांगले मीटर जाणीवपूर्वक ‘फॉल्टी’ दाखवून नागरिकांना हजारो रुपयांचा भुर्दंड लावला जात आहे. ही वाढीव वीजबिले तत्काळ कमी करावीत, अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कंपन्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा खणखणीत इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे. जिल्ह्यात सध्या महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, वीज ग्राहकांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये वीज मीटरचे रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांकडून नागरिकांना अवाच्या सव्वा बिले दिली जात आहेत. या कंपन्या जाणीवपूर्वक नागरिकांचे चांगले मीटर ‘फॉल्टी’ असल्याचे दाखवत आहेत. त्याद्वारे ग्राहकांना 5 हजार, 7 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतची वाढीव बिले देऊन स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला जात आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता तसेच प्रत्येक भागातील संबंधित अभियंत्यांनी या प्रकाराची तत्काळ दखल घ्यावी. रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यासोबत तातडीने बैठक घ्यावी आणि जाणीवपूर्वक मीटर फॉल्टी दाखवून दिलेली वाढीव बिले तत्काळ कमी करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि नागरिकांची लूट थांबवली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. महावितरणचे अधिकारी आणि रीडिंग कंपन्यांचे प्रतिनिधी ज्या-ज्या ठिकाणी दिसतील, त्या ठिकाणी त्यांना ‘क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या भाषेत’ चोख उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराही मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे आणि जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे.
Source link
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक:वाढीव वीजबिले तत्काळ कमी करा, अन्यथा 'क्रांतिकारी' भाषेत उत्तर देऊ- गजानन कावरखे