Headlines

शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबारावरून रवींद्र धंगेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप:म्हणाले, पुणे गुन्हेगारांचं शहर झालंय




पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे या तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यात गोळीबारासह कोयता आणि चॉपरने वार करण्यात आल्याची घटना घडली. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी घटनास्थळी भेट देत पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पोलीस प्रशासन आणि बिल्डर लॉबी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजीनगर न्यायालयाच्या अगदी जवळ हा हल्ला झाल्याने परिसरातील सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर शिवाजीनगर न्यायालय, कौटुंबिक न्यायालय आणि फौजदारी खटले चालणारे न्यायालय आहे. त्याच परिसरात मेट्रोचे कार्यालयही आहे. या भागात दररोज मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वावर असतो. असे असतानाही न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारे गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे धंगेकर यांनी म्हटले. पोलीस बंदोबस्त असतानाही हल्ला कसा झाला? या घटनेवर बोलताना धंगेकर म्हणाले की, न्यायालयाच्या परिसरात हजारो पोलिसांचा रोजचा वावर असतो. पोलिसांची एवढी मोठी उपस्थिती असतानाही अशा प्रकारचा हल्ला होतो, यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. घटनास्थळी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एवढ्या महत्त्वाच्या परिसरात सुरक्षेच्या आणि आपत्कालीन सुविधांच्या बाबतीत प्रशासनाने अधिक दक्ष असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीच्या व्यवहारातून गुन्हेगारीला खतपाणी? मंदार किवळे याच्यावर झालेला हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचे सांगत धंगेकर यांनी पुण्यातील जमीन व्यवहार आणि गुन्हेगारी यांच्यातील कथित संबंधांवर गंभीर आरोप केले. कात्रज परिसरातील दोन तरुणांमधील वादातून हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले. आंबेगाव, नऱ्हे आणि कात्रज या भागांमध्ये जमिनींचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. या भागात पोलीस ठाण्यांमध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी अधिकारी पैसे देतात, असा आरोपही त्यांनी केला. जमिनींच्या व्यवहारांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने या आर्थिक व्यवहारांमध्ये काही पोलीस अधिकारी, गुन्हेगार आणि बिल्डर लॉबी यांच्यात संगनमत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. अशा गुन्हेगारांना पाठबळ दिले जात असल्याने शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचेही ते म्हणाले. अर्थात, त्यांनी केलेले हे आरोप असून त्याबाबत स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. ‘पुणे गुन्हेगारांचं आणि बिल्डरांचं शहर झालंय’ पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करताना धंगेकर यांनी शहराच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली. पुणे शहर गुन्हेगारांचं, चोरांचं आणि बिल्डरांचं शहर होत चाललं आहे. प्रशासनावर अंकुश ठेवणारा नेता दिसत नाही. शहरातील सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि पाण्याचे प्रश्नही रामभरोसे असल्याची टीका त्यांनी केली. मागील आठवड्यात कोथरूडमध्येही जमिनीच्या वादातून अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचा दाखला त्यांनी दिला. एका भाजपच्या महिला कार्यकर्तीच्या वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात बिल्डर आणि पोलीस एकत्र येऊन अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा घटनांमुळे पुणेकरांमध्ये प्रशासनाविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले. अजितदादांचा उल्लेख करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न पुण्यात एखादी गंभीर घटना घडल्यानंतर यापूर्वी अजित पवार स्वतः पहाटे घटनास्थळी जाऊन पाहणी करत असत. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुढील कार्यवाहीची दिशा ठरवत असत. त्यांच्या काळात प्रशासनावर एक प्रकारचा वचक होता. मात्र, आता शहरात तसा वचक राहिलेला दिसत नसल्याची खंत धंगेकर यांनी व्यक्त केली. गृहखात्याने लक्ष घालावे, फडणवीस सक्षम आहेत – धंगेकर दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या पालकत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी मागणी केल्याबाबत धंगेकर यांना विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य आपण पाहिले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असून ते या प्रकरणात जातीने लक्ष घालतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनीच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे धंगेकर म्हणाले. गृहखाते पालकमंत्र्यांचे किती ऐकते, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा…. भावाच्या मृतदेहासमोरच घेतली होती बदल्याची शपथ:2025चे ते प्रकरण काय? ज्यामुळे पुण्यात कोर्टाबाहेरच मंदार किवळेवर झाला जीवघेणा हल्ला पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास मंदार मारुती किवळे (वय 35) या तरुणावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या जीवघेण्या हल्ल्यामागे एका वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 2025 मध्ये कात्रज येथील संतोषनगरमध्ये हत्या झालेल्या शुभम चव्हाण याच्या मृतदेहासमोरच त्याचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण आणि मित्रांनी बदला घेण्याची शपथ घेतली होती. मंदार किवळे हा 4 ते 5 दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती मिळताच अक्षय चव्हाण याने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून हा संपूर्ण कट रचला आणि कोर्टाबाहेर त्याला गाठून कोयत्याने सपासप वार करत त्याचे दोन्ही हात शरीरापासून वेगळे केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ताब्यात घेतलेल्या 6 आरोपींची पहाटे 5 वाजता ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे; आज दुपारी 2 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. सविस्तर वाचा……



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *