![]()
महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल. सध्या महावितरणकडून पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी राज्यभरात देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरीस ही सर्व कामे पूर्णत्वास जातात. यापूर्वी सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून ही कामे केली जात होती, ज्यामुळे नागरिकांना गैरसोय होत होती. या गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी मुख्यालयाकडून नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. यापुढे संबंधित वीजवाहिनीवरील पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यानच करावीत. तसेच, ही कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आणि संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंग मेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप करणे, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती करणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण करणे, तारांमधील झोळ काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉप-अप अशा विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.
Source link
महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती