![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. गेल्या वर्षी ९६२ कलावंतांनी सहभाग घेतला होता. यंदा दीडपटीने म्हणजेच १ हजार ५१८ युवक कलावंत सहभागी झाले आहेत. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना महोत्सवात सहभागी होण्याचे आदेश दिले होते. अन्यथा दंड लावण्यात येणार आहे, यामुळे विद्यार्थी संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. वंदे मातरम सभागृहात सकाळी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, महापौर समीर राजूरकर, विक्रम काळे, संयोजक प्राचार्य डॉ. वैशाली संतोष देशमुख, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या महापौर करंडक एकांकिका स्पर्धेला नवसंजीवनी मिळणार आहे. ही स्पर्धा जानेवारीत पुन्हा आयोजित केली जाणार आहे. मनपाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महापौरांनी केली. कलावंतांची पायाभरणी : सावे शंभर वर्षांची परंपरा असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय व ७ दशकांची परंपरा विद्यापीठाला आहे. या दोन्ही संस्थांमधून ज्ञानवंत, गुणवंत अन् कलावंत घडले, तर महोत्सवातून राज्य-राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळालेले कलावंत घडले आहेत, असे प्रतिपादन अतुल सावे यांनी केले. माणूस घडवणारे शिक्षण हवे : कुलगुरू विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, वाणिज्य आदी शाखेतून तंत्रज्ञ व व्यावसायिक तज्ज्ञ घडतात, तर ललित कला व मानव्यविद्या शाखेतून माणूस घडत असतो. त्यामुळे हेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. फुलारी यांनी केले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला एक लाखाचे व्यक्तिगत बक्षीस देऊ, असे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी घोषित केले. युवा महोत्सवाचे उद्घाटन करताना मंत्री अतुल सावे, कुलगुरू डॉ. विजय फुलारी , आ. विक्रम काळे आदी. वंदे मातरम सभागृह पांढरा हत्ती, मनपाला चालवायला द्यावे वंदे मातरम सभागृह हा उच्च शिक्षण विभागासाठी ‘पांढरा हत्ती’ ठरला आहे. महापालिकेने सदर नाट्यगृह चालवण्यास घ्यावे, भाडेही कमी करावे, असे विक्रम काळे म्हणाले. अस्वस्थतेच्या काळात समाजात सौहार्दाचे वातावरण कायम राहावे यासाठी युवक महोत्सवाच्या कला सादरीकरणातून प्रबोधन व्हावे, अशी अपेक्षा विक्रम काळे यांनी व्यक्त केली.
Source link
महोत्सवात गेल्या वर्षी 962 कलावंत, यंदा 1518 युवा कलावंतांचा सहभाग:युवा महोत्सव महापौर करंडक एकांकिका स्पर्धा जानेवारीत : समीर राजूरकर