Headlines

साकडे:घाटनांद्रा ते जोगेश्वरी देवीकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांना साकडे




जोगेश्वरी देवी आणि इंद्रगढी देवी मंदिराकडे जाणाऱ्या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि उखडलेले डांबर यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी श्री जोगेश्वरी देवी संस्थान आणि घाटनांद्रा ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. जोगेश्वरी देवी व इंद्रगढी देवी ही केवळ स्थानिकच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरातील भाविकांची कुलस्वामिनी मानली जाते. नवरात्रोत्सवात या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. त्यामुळे या काळात मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होणे, टायर पंक्चर होणे अशा घटना रोजच्याच झाल्या आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींना अनेक वेळा साकडे घालण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अंदाजपत्रकीय तरतूद करून डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे, अशी ठाम मागणी केली जात आहे. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्यास हजारो भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन संस्थानचे उपाध्यक्ष कृष्णा बाजीराव मोरे, सचिव सुनील नामदेव मोटे, प्रकाश बारस्कर, माजी सरपंच शिवनाथ चौधरी आणि माधवराव तायडे आदींनी केले आहे. घाटनांद्रा येथील जोगेश्वरी देवीकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे निवेदन पालकमंत्री संजय शिरसाट यांना देताना संस्थानचे पदाधिकारी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *