![]()
सचिन अहिर यांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे. कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या गटातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरणे बदलत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला धक्का पोहोचवणारे राजकारण करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, माणसं ओळखण्यात चूक झाली असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच अपयशी ठरवले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही, अशी कबुली देत राऊत सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता कमी करत आहेत. उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यात असल्याचा संदेशही त्यांच्या वक्तव्यांतून दिसत आहे. उबाठाच्या नावावर खंजीर खुपसण्याचा इतिहास नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विकास, सुशासन आणि जनतेचा विश्वास मिळवून इतिहासात सुवर्ण अध्याय निर्माण केला आहे. उलट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नावावर पक्षात खंजीर खुपसण्याचा आणि जनतेने नाकारल्याचा इतिहास नोंदवला गेला आहे. इतिहासाचे काळे पान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नाही, तर महाराष्ट्राशी आणि विचारांशी द्रोह करणाऱ्यांच्या नावावर आहे, असा टोला राऊतांना लगावला आहे. राऊतांनी स्वत:च्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेचा विश्वास यामुळेच त्यांना पुन्हा-पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे विनाकारण त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा राऊतांनी स्वतःच्या राजकीय भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे. एसआरए, कमिशन आणि पत्राचाळ घोटाळ्यांशी संबंधित आरोपांची चर्चा झाली की संजय राऊत यांचे नाव पुढे येते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचे ध्येय महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य बनविण्याचे आहे. मविआच्या काळातील गैरव्यवहारावर बोला नवनाथ बन म्हणाले की, राम मंदिराच्या कामात कुणीही गैरव्यवहार केला असेल तर त्याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल. मात्र संजय राऊत यांनी या विषयावर बोलण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळातील भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांबाबत उत्तर द्यावे. रोजच्या वसुलीच्या आरोपांनी गाजलेल्या सरकारच्या काळातील कारभाराचा हिशोब जनतेला देण्याची जबाबदारी त्यांची आहे.छोटे किंवा मोठे शंकराचार्य यावर राजकारण करण्याऐवजी संजय राऊत यांनी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे. भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू समाज हिंदुत्वाच्या प्रश्नांवर सजग आहे. त्यामुळे हिंदुत्वाचे धडे भाजपला देण्यापेक्षा आपल्या बदलत्या भूमिकांचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी द्यावे.
Source link
माणसं ओळखण्यात चूक झाली म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंचंच अपयश दाखवलं:उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यातच- नवनाथ बन