![]()
पुण्यातील वाहतूक कोंडी आणि गर्दीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन टेम्पो चालकाने मोठा थरार उभा केला. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पोलिसांची विशेष कारवाई सुरू असताना, एका अल्पवयीन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो सुसाट पळवला. या पाठलागादरम्यान त्याने चार वाहनांना धडक दिली. जमावाने पाठलाग करून या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमकी काय घडली घटना? पुणे शहरात सध्या काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम सुरू आहे. वानवडी वाहतूक विभागाच्या पथकाने वैदूवाडी परिसरात काळ्या काचा असलेला ‘MH 42 AR 4246’ क्रमांकाचा टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे आणि इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि टेम्पो भरधाव वेगाने पुढे दामटला. वाहन न थांबवता पळवणाऱ्या या टेम्पोचा वाहतूक पोलिसांनी आणि रस्त्यावरील काही नागरिकांनी पाठलाग सुरू केला. यावेळी टेम्पो चालकाने अत्यंत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे टेम्पो चालवत रस्त्यावरील तीन ते चार वाहनांना धडक दिली. या चालकाने काही ठिकाणी पोलिसांच्या अंगावरही टेम्पो घालण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही आणि डॅश कॅमेरा फुटेजमध्ये कैद झाले आहे. जमावाचा चोप आणि 15 नंबर चौकात अटक सुसाट पळणाऱ्या या टेम्पोला अखेर काही सजग नागरिकांनी आणि पोलिसांनी 15 नंबर सिग्नलजवळ एका टँकरच्या मदतीने अडवले. टेम्पो थांबताच संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि जमावाने चालकाला चोप दिला. मात्र, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून जमावाच्या तावडीतून चालकाला सोडवले आणि सुरक्षितपणे हडपसर पोलीस ठाण्यात नेले. धडक बसलेल्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याने आणि कोणीही जखमी नसल्याने अपघातग्रस्त वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेले. चालक निघाला १७ वर्षांचा अल्पवयीन, मालकावर गुन्हा पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली. हा बेदरकार टेम्पो चालक अवघ्या १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा निघाला. हडपसर पोलिसांनी चालक आणि वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्यास दिल्याच्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी, आता टेम्पो मालकावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 110 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात अल्पवयीन चालकांकडून (उदा. पोर्श कार अपघात) होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशातच या टेम्पो चालकाने ऐन गर्दीच्या वेळी उडवलेल्या या थरारामुळे पुण्यातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Source link
17 वर्षीय अल्पवयीन चालकाचा थरार, व्हिडिओ:पोलिसांना चकवा देत भरधाव टेम्पोने उडवली चार वाहने, हडपसरमधील घटनेने खळबळ