![]()
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 30 जून रोजी दुपारी घडली. सार्थकचे वडील आकाश नामदेव आमले (वय 27) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. मूळचे नांदेड जिल्ह्यातील मोहापूर गावचे रहिवासी असलेले हे दाम्पत्य इनामगावातील नांदेमळा येथे राहते. घटनेच्या दिवशी, 30 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आमले दाम्पत्य इतर मजुरांसह संजय सातव यांच्या केळीच्या बागेत काम करत होते. त्यांनी आपला मुलगा सार्थक याला सोबत आणले होते. सार्थक शेततळ्यापासून काही अंतरावर मोबाइलवर गाणी ऐकत खेळत होता. काही वेळाने मोबाइलवरील गाण्यांचा आवाज बंद झाल्याने पालकांनी सार्थकचा शोध घेतला. सार्थक जागेवर दिसला नाही, तेव्हा तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. संजय सातव आणि ग्रामस्थांना याची माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. सार्थक शेततळ्यात बुडाल्याचे आढळले. गावातील तरुणांनी त्याला बाहेर काढून तातडीने मांडवगण फराटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, लोणी काळभोर परिसरातही अशाच एका घटनेत दोन वर्षांच्या बालकाचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोहम लखन कसबे (वय 2) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात घडली. सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. सोहम घरासमोर खेळत असताना याच खड्ड्यातील पाण्यात पडला. तो न दिसल्याने त्याच्या आईने, शिल्पा कसबे (वय 23), शोध घेतला असता तो खड्ड्यात बुडाल्याचे आढळले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची फिर्याद सोहमची आई शिल्पा यांनी दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एन जगताप तपास करत आहेत.
Source link
शिरूरमध्ये शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू:मोबाइलवरील गाण्यांचा आवाज बंद झाल्यावर शोध सुरू झाला