![]()
सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी संवाद साधला आणि हे सर्व अवघ्या 18 ते 20 तासांत अचानक घडल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे आहे. ‘ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना उपसभापतीपद देणे गरजेचे होते’, असे सत्तार म्हणाले. जर सत्तार यांचा दावा खरा असेल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. एखादी व्यक्ती अवघ्या 5 मिनिटांत गद्दार होऊ शकत नाही, यामागे नक्कीच काहीतरी दडलेले आहे जे शोधणे गरजेचे आहे, असा खळबळजनक संशय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीला बहुधा सचिन अहिर अनुपस्थित होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, आजपर्यंत पक्षाने ज्यांना भरभरून दिले, मोठे केले, तेच लोक आज पक्ष सोडून जात आहेत. याउलट, ज्यांना आजपर्यंत काहीच मिळाले नाही, ते सामान्य शिवसैनिक अजूनही जमिनीवर राहून पक्षासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. आता तरी या निष्ठावंतांना पदे आणि संधी मिळाली पाहिजे. आता कोणावरही विश्वास ठेवता येत नाही सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाराष्ट्राने आजपर्यंत कधीही बघितले नव्हते, असे सुडाचे राजकारण सध्या एकनाथ शिंदे करत आहेत. सद्यस्थिती इतकी भयानक झाली आहे की, आता आपल्या सावलीवर आणि विश्वासू माणसांवरही संशय घेण्याची वेळ आली आहे. कोणावर शंका घ्यावी आणि कोणावर नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आष्टीकर यांना उमेदवारी दिली जाऊ नये, असे मी आधीच सांगितले होते, कारण हा माणूस कधीही पलटी मारू शकतो, याची आम्हाला खात्री होती, असेही त्यांनी सांगितले. मोठ्या पदाच्या मोहापायीच निर्णय सुषमा अंधारे म्हणाल्या की, 2 दिवसांपूर्वीच आमचे बोलणे झाले होते आणि आम्ही 29 तारखेला भेटणार होतो. पण वटपौर्णिमा असल्याने मी मुंबईत येऊ शकले नाही. त्यानंतर काल सकाळी 11 वाजता आमची भेट ठरली होती, पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे मला पोहोचायला उशीर झाला आणि त्याच वेळात सचिन अहिर यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी पक्ष सोडण्यापूर्वी मला फोन केला होता, कदाचित ते याबद्दल काही बोलणार असतील. पण आमची भेट झाली नाही. नंतर मी त्यांना विचारले की, भाऊ, तुम्ही किमान एक कल्पना तरी द्यायला हवी होती. सचिन अहिर हे पूर्ण वेळ आदित्य ठाकरेंसोबत असायचे, त्यामुळे ‘ठाकरे वेळ देत नाहीत’ हे कारण ते देऊ शकत नाहीत. मोठ्या पदाच्या मोहापायीच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. ..म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला याबद्दल काही माहिती नव्हती. पिंपरी चिंचवडमधील सोनिग्राचे एक विकासक आहे, त्यांची एक लक्षवेधी लावण्यात आली होती त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेत त्यांना कागदपत्रे देणार होते. त्यामुळे मी आणि चेतन पवार हे त्यांच्या संपर्कात होतो.
Source link
अहिरांनी 6 खासदार फोडले म्हणून बक्षीस? सत्तारांच्या दाव्याने शिवसैनिक गोंधळात:ज्यांना भरभरून दिलं तेच सोडून गेले; आता सामान्य शिवसैनिकांना संधी द्या– सुषमा अंधारे