![]()
ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना महापालिकेच्या एका कंत्राटदाराने तब्बल दीड कोटी रुपयांची आलिशान व्होल्वो कार भेट दिल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी केला आहे. याप्रकरणी जेया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, पुराव्यादाखल आवश्यक कागदपत्रे, छायाचित्रे आणि व्हिडीओही सादर केले आहेत. या आलिशान कारची नोंदणी महापालिकेचे कंत्राटदार प्रमोद कृष्णा पवार यांच्या नावावर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या आणि पतीच्या नावावर केवळ तीन दुचाकी वाहने असल्याचे दाखवले असून कोणत्याही चारचाकी वाहनाचा उल्लेख केलेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. याप्रकरणी केवळ कारची भेट हाच मुद्दा नसून, मोठ्या भ्रष्टाचाराचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कंत्राटदार प्रमोद पवार यांना प्रभाग क्रमांक 3 मधील विशेष निधीतून सुमारे 200 कोटी रुपयांची विविध कामे मिळाली आहेत. त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी व्हावी आणि यात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणावा, अशी मागणी जेया यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या आरोपामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजय जेया यांनी काय सांगितले? सामाजिक कार्यकर्ते अजय जेया म्हणाले की, आज मी इथे अँटी करप्शनला आलो आहे, तिथे आम्ही मीनाक्षी शिंदेंच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या भ्रष्टाचाराचा हा पहिला भाग आहे, ज्याबाबत आम्ही आज अँटी करप्शनला पत्र दिले आहे. मीनाक्षी शिंदे ज्या गाडीमध्ये फिरत आहेत, ती दीड कोटी रुपयांची व्होल्वो गाडी आहे. जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले जाते, तेव्हा त्या याच गाडीमध्ये येतात. पुढे अजय जेया यांनी म्हटले की, आम्ही मीनाक्षी शिंदे यांचे प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) काढले, त्यामध्ये त्यांनी राजेंद्र शिंदे आणि स्वतःच्या नावावर केवळ तीन दुचाकी असल्याचे म्हटले असून, आपल्याकडे कोणतीही चारचाकी नाही असे नमूद केले आहे. परंतु, इतक्या वर्षांपासून त्या वेगवेगळ्या चारचाकी गाड्यांमध्ये फिरत आहेत आणि त्यातलीच एक ही दीड कोटी रुपयांची व्होल्वो गाडी आहे, जी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. हा सर्व प्रकार तुम्ही आजही त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये बघू शकता. हे व्हिडिओ किंवा फोटो आम्ही मॉर्फ केलेले नाहीत. मीनाक्षी शिंदे यांच्या मुलीने या नवीन गाडीचे अभिनंदन करणाऱ्या शोरूममधील व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावर ठेवला आहे. यामध्ये मीनाक्षी शिंदे यांचे नाव, फोटो आणि हे सर्व व्हिडिओ आताही त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येतील. कदाचित आता ते हे डिलीट करतील. आता या गाडीचा भ्रष्टाचाराशी कसा संबंध आहे, हे मी तुम्हाला सांगतो. ही गाडी एका कंत्राटदाराच्या नावाने आहे. त्याचे पुरावे तुम्ही कोणत्याही कागदपत्रांमध्ये पाहू शकता. प्रमोद कृष्णा पवार असे या कंत्राटदाराचे नाव असून, गाडीचा नंबर MH04MH008 असा आहे. हा कृष्णा पवार कोण आहे? तर हा महानगरपालिकेचा कंत्राटदार आहे. महानगरपालिकेमध्ये त्यांनी आजपर्यंत सुमारे 200 कोटींची कामे केली आहेत. विशेषतः मीनाक्षी शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ‘कंचन कन्स्ट्रक्शन’ या नावाने त्यांनी कामे केली आहेत. एकनाथ मुख्यमंत्री असताना जेव्हा सर्वांना स्पेशल फंड देण्यात आला होता, त्या निधी अंतर्गत त्यांनी ही मोठी कामे केली असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. समजा मीनाक्षी शिंदे यांना ही गाडी गिफ्ट म्हणून दिली असेल, तर कंत्राटदाराकडून कोणतीही वस्तू गिफ्ट म्हणून घेतलेली असल्यास त्याची नोंद प्रतिज्ञापत्रात करायला हवी होती, जी त्यांनी केलेली नाही. उद्या मीनाक्षी शिंदे अशीहीू शकतात की ही गाडी माझीच नाही, मग त्या कंत्राटदाराच्या गाडीत कशा काय फिरत आहेत? या सर्व गोष्टी आणि कागदपत्रे आम्ही अँटी करप्शनच्या निदर्शनास आणून दिली आहेत, आणि ते यावर निश्चित कारवाई करतील. मीनाक्षी शिंदेंकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अजय जेया म्हणाले की, मीनाक्षी शिंदेंनी त्यांच्या विभागामध्ये कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी कोट्यवधींचा मोबदला कुठे पैशांच्या स्वरूपात तर कुठे गाडीच्या स्वरूपात घेतला आहे. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण मालमत्ता सुमारे पाच कोटी रुपये दाखवली आहे, तरीही त्यांच्याकडे कंत्राटदाराच्या नावावर असलेली दीड कोटी रुपयांची गाडी आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे म्हटले होते की आमचा कोणत्याही कंत्राटदाराशी संबंध नाही किंवा आम्ही महापालिकेत कंत्राटदार नाही. परंतु महानगरपालिकेच्याच कंत्राटदाराकडून असा मोबदला घेणे हे अँटी करप्शनच्या कायद्याचे उल्लंघन आहे, आणि त्याच मुद्द्यावर मी आज तक्रार दिली आहे. मीनाक्षी शिंदे ज्या व्होल्वो गाडीमध्ये फिरत आहेत, ती दीड कोटीची गाडी त्यांना गिफ्ट म्हणून मिळाली आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अशा कोणत्याही गिफ्टची नोंद नाही. मात्र, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्या ज्या व्होल्वो गाडीचा वापर करतात, ती कोट्यवधींची कामे करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. यावरून महानगरपालिकेच्या यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना फायदा करून दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते, म्हणूनच आम्ही आज अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अजय जेया यांनी दिली आहे.
Source link
मीनाक्षी शिंदेंच्या अडचणीत वाढ!:200 कोटींच्या भ्रष्टाचाराचा संशय, कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; तक्रार दाखल