![]()
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांनी आजच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ‘विलीनीकरणाला दादा गेल्यापासून फुलस्टॉप मिळाला आहे, असे स्पष्ट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही या विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तरी विलीनीकरणाची किंवा केंद्रात सत्तेत जाण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. या चर्चा केवळ घडवून आणल्या जात आहेत, असा दावा खासदार लंके यांनी केला आहे. ‘आमच्यापर्यंत अशी कोणतीही माहिती नाही’ निलेश लंके म्हणाले, आमच्यापर्यंत अशा कोणत्याही गोष्टी आतापर्यंत तरी आलेल्या नाहीत. आमचा नेता खंबीर आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आम्ही अशा चर्चांमध्ये सहभागी होत नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. मात्र, सध्या तरी पक्षपातळीवर अशा कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत. तसेच, केंद्रात सत्तेत जाण्याबाबत देखील कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. ‘राजकारणात कृतीपेक्षा चर्चाच जास्त होतात’ लंके म्हणाले, राजकारणामध्ये बऱ्याच वेळा प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चाच जास्त होत असतात. गेल्या १०-१५ दिवसांपासून आम्हीही पाहतोय की वेगवेगळ्या माध्यमांतून विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहेत. पण पक्ष पातळीवर किंवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. मला जेवढी माहिती आहे, त्यानुसार अद्याप तरी अशी कोणतीही हालचाल नाही. ‘चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत’ “या चर्चा आत्ताच का होत आहेत?” या प्रश्नावर थेट उत्तर देताना लंके म्हणाले, या सर्व चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत, असेच मला वाटते. कारण जर खरोखरच असे काही असते, तर पक्षपातळीवर आम्हाला नक्कीच काही माहिती असती. पण माझ्याकडे अद्याप अशी कोणतीही माहिती नाही, याचाच अर्थ या चर्चा केवळ घडवून आणलेल्या आहेत.” सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला दुजोरा देत ते म्हणाले, “थोड्या वेळापूर्वीच आदरणीय सुप्रियाताईंनीही प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले आहे की अशी कुठलीही चर्चा नाही. मी त्यांच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. निलेश लंके एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
————— हेही वाचा.. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम:विलीनीकरणाची तारीखही ठरली होती, दादांसोबत चर्चा झाली होती- सुप्रिया सुळेंचा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या विलीनीकरणाच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती, अगदी तारीखही ठरली होती. पण ज्या दिवशी दादा गेला, त्या दिवशी माझ्या मनात आणि पक्षामध्ये या विलीनीकरणाला कायमचा ‘फुलस्टॉप’ मिळाला आहे,” असे स्पष्ट विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सविस्तर वाचा
Source link
राजकारणात कृतीपेक्षा चर्चाच जास्त होतात:विलीनीकरणाबाबत माझ्यापर्यंत कोणतीही माहिती नाही- निलेश लंके