![]()
कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानंतर तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीने ही जमीन ३०० कोटी रुपयांत अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ‘अमेडिया’ कंपनीतील संबंधितांना या गैरव्यवहाराची माहिती होती, असा दावा तेजवानी यांच्या वकिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दोन स्वीय सहायकांना नोटीस बजावली आहे. याशिवाय आणखी ८ ते १० जणांची चौकशी करून जबाब नोंदवले जातील. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित केली जाईल. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या जमिनीत २७५ जणांचा संबंध असून, संबंधितांनी शीतल तेजवानी यांना कुलमुखत्यारपत्र दिले होते. त्यानंतर ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजय पाटील यांनी तेजवानींकडून शेतजमीन नावावर असलेल्या व्यक्तींचे कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. काय आहे आरोप? माहिती-तंत्रज्ञान पार्कच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेत मुद्रांक शुल्कात २१ कोटी रुपयांची सवलत लाटण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि मुद्रांक शुल्क कार्यालयातून या जमिनीची जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे व नोंदी मिळवल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात दोन ते तीन जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
Source link
मुंढवाप्रकरणी सुनेत्रा पवारांच्या 2 पीएंना गुन्हे शाखेची नोटीस:आठ ते दहा जणांचे जबाब नोंदवले जाणार