![]()
पुण्यातील मुंढवा परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात (दिग्विजय पाटील यांचे नाव ‘आरोपी क्रमांक 2’ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात केवळ शीतल तेजवानी यांचेच नाव होते. मात्र, आता दिग्विजय पाटील यांच्यावर दोषारोप निश्चित झाल्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे. दिग्विजय पाटील हे ‘अमेडिया’ कंपनीचे भागधारक आहेत. या जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या दस्तऐवजांवर कंपनीच्या वतीने दिग्विजय पाटील यांची स्वाक्षरी आढळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय जमीन परस्पर खरेदी करणे आणि व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचे आरोप ठेवले आहेत. हे तटकरे अन् भाजपचे षडयंत्र या घडामोडींवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. दमानिया म्हणाल्या की, या संपूर्ण गैरव्यवहाराचा खरा ‘मास्टरमाइंड’ पार्थ पवारच आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या 40 एकर जमिनीवर त्यांची नजर होती. हा व्यवहार पार्थ यांनी केला नसून केवळ दिग्विजय यांनी केला आहे, हे कोणालाही पटणारे नाही. या प्रकरणात दिग्विजय पाटील यांचा वाटा केवळ 1 टक्का, तर पार्थ पवार 99 टक्के भागीदार आहेत. पुढे बोलताना त्यांनी, दिग्विजय यांच्यावर झालेली कारवाई हे भाजप आणि सुनील तटकरे गटाचे एक राजकीय षडयंत्र असल्याचाही दावा केला. नेमके प्रकरण काय? कोरेगाव पार्क/मुंढवा परिसरातील सुमारे 40 एकर जमीन या वादाच्या केंद्रस्थानी आहे. 1819 मध्ये ही जमीन ‘महार वतन’ म्हणून देण्यात आली होती. 1957 मध्ये ती शासनाकडे वर्ग झाली आणि 1962 मध्ये ती ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्रा’ला (BSI) भाडेतत्त्वावर देण्यात आली. यातील केवळ 3 एकर जागेवर केंद्राचे काम चालत होते, तर उर्वरित जागा जंगल स्वरूपात होती. 2006 मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानी यांना ‘पॉवर ऑफ अटर्नी’ देण्यात आली. त्यानंतर ही जमीन नियमबाह्य पद्धतीने पार्थ पवार यांच्याशी संबंधित ‘अमेडिया’ कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
Source link
मुंढवा जमीन घोटाळा:दिग्विजय पाटील आरोपीच्या पिंजऱ्यात, पार्थ पवार 99 टक्के भागीदार, दिग्विजय फक्त मोहरा- अंजली दमानिया