![]()
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चार लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे एका मद्य विक्री दुकानात कामाला असून, रात्री बाराच्या सुमारास दुकानातील जमा झालेले ३ लाख ९९ हजार रुपये मालकांच्या घरी देण्यासाठी निघाले होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कांबळे यांना अडवले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. लिटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बँक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना दरम्यान, भवानी पेठ परिसरात एका बँकेत गोंधळ घालून कर्मचारी आणि व्यवस्थापकाला शिवीगाळ केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल राजू वाघरेशा (वय २८) आणि राजू वाघरेशा (वय ५८, दोघे रा. गोमराज व्हिला, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. बँक व्यवस्थापक श्रीआंश श्रीदेव सिंग (वय ३९, रा. रॉयल एनरिच सोसायटी, भोसले गार्डन, हडपसर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास भवानी पेठेतील कल्पतरु प्लाझा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत आले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी बँक व्यवस्थापक सिंग यांच्या दालनात शिरले आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. सिंग यांनी बँकेतील सुरक्षारक्षक सोमनाथ जगताप यांना माहिती दिली असता, आरोपींनी जगताप यांनाही धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा आणणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तरुणाला लुटले:कोयत्याचा धाक दाखवून 4 लाखांची रोकड लंपास; दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा