Headlines

मुख्यमंत्री-मंत्री दिखाव्याची दिवाळी साजरी करायला चाललेत:सुप्रीम कोर्टाच्या निकालाने मोदी सरकारचा OBC तरुणांचा घात करण्याचा डाव उधळला; विजय वडेट्टीवार आक्रमक




“आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. पण शेतकऱ्याच्या घरात दिवा लावायला साधे तेल तरी आहे का? त्याच्या मुलांच्या ताटात आज जेवायला अन्न नाही, संपूर्ण दिवाळी अंधारात जात असताना तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला जात आहात का? 5,000 रुपयांची घोषणा केली, ती सुद्धा अद्याप मिळालेली नाही. दिखावा करण्यापेक्षा आधी शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 1 लाख रुपये मदत जमा करा आणि मग त्यांच्या घरी जा; शेतकरी तुमचे पंचपक्वान्नांनी स्वागत करतील आणि ओवाळणी करतील,” अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी यूपीएससी-एमपीएससीतील 1,000 ओबीसी उमेदवारांच्या निवडीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे स्वागत करत केंद्र सरकारवर टीका केली. तसेच पोलीस व आरोग्य विभागातील भरती घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या नावाने 3 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर परखड भाष्य केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने 1,000 OBC अधिकाऱ्यांचे भविष्य वाचले -वडेट्टीवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ओबीसी उमेदवारांच्या क्रिमी लेयर (Non-Creamy Layer) वादावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावल्यानंतर वडेट्टीवार यांनी मोठा आनंद व्यक्त केला. “2016 पासून 2026 पर्यंत सुमारे 1,000 ओबीसी तरुण-तरुणींचे भविष्य केंद्र सरकारने उद्ध्वस्त करण्याचे काम केले होते. जे आज जिल्हाधिकारी (Collector), पोलीस अधीक्षक (SP), सीबीआय (CBI), इन्कम टॅक्स आणि ईडीमध्ये (ED) अधिकारी म्हणून दिसायला हवे होते, त्यांना 8 लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेचे कारण पुढे करून डावलले गेले. ओपन प्रवर्गापेक्षा जास्त गुण मिळवूनही त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले गेले.” सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची अपील फेटाळली “स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सरकारने या विद्यार्थ्यांच्या निवडीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले होते. मात्र काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही अपील फेटाळून लावत आधीचा निर्णय कायम ठेवला. क्लास-2, क्लास-3, क्लास-4 कर्मचारी, शेतकरी, बँक व खाजगी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे उत्पन्न 8 लाखांच्या वर असले तरी त्यांना नॉन-क्रिमी लेयरचा अधिकार डावलता येणार नाही (फक्त व्यापारी आणि क्लास-1 अधिकारी वगळून), हे स्पष्ट झाले आहे. बहुजन समाजाला आयएएस-आयपीएस (IAS-IPS) होण्यापासून रोखण्याचे सरकारचे षड्यंत्र सुप्रीम कोर्टाने हाणून पाडले; त्याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.” मुख्यमंत्र्यांच्या नावाने 3 कोटी उकळले जातायत राज्यातील भ्रष्टाचार आणि भरती घोटाळ्यांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “कालच मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक गुन्हा दाखल झाला आहे. थेट मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून एका व्यक्तीने बिल काढून देण्याच्या नावाखाली एका कंत्राटदाराकडून 3 कोटी रुपये वसूल केले. काम झाले नाही म्हणून अखेर गुन्हा दाखल झाला. लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हे असले तरी आज महाराष्ट्रात कोणाचीही भीती न बाळगता बिंदास्तपणे लूट आणि लाचखोरी सुरू आहे. राज्यात राजाचा धाकच उरलेला नाही.” आरोग्य व पोलीस भरतीत 15-15 लाखांचा महाघोटाळा “पोलीस भरतीतील बनावट प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद खून झाला आहे. दुसरीकडे आरोग्य विभागात बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल 400 लोकांना नोकरीवर रुजू करून घेतले गेले आणि त्यांचा पगारही झाला! प्रत्येकी 10 ते 15 लाख रुपये घेऊन हा कोट्यवधींचा स्कॅम झाला असून याच्यामागे मोठे शासकीय अधिकारी सामील आहेत. हे सरकार आंधळे, बहिरे आणि अपंग झाले आहे.” पवार साहेब कधीही भाजप-एनडीए सोबत जाणार नाहीत पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना आलेला फोन आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार साहेबांनी संपूर्ण आयुष्य ज्या पुरोगामी विचारांसाठी वेचले, ते सोडून ते कधीही एनडीए (NDA) किंवा मोदी सरकारला पाठिंबा देणार नाहीत. गेल्या वेळी पक्ष फुटला तेव्हाही त्यांना एनडीएत येण्याचा आग्रह झाला होता, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला.” पाण्याविना मासा तडफडतो तसे काही नेत्यांचे झालेय “दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल असे मला दूरदूरपर्यंत वाटत नाही. ज्यांचे हात दगडाखाली आहेत आणि जे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत—जसे पाण्याविना मासा तडफडतो तसे सत्तेविना जे तडफडतात—त्यांना विलीनीकरणानंतरही सरकारमध्येच राहायचे आहे; पण शरद पवार साहेब हे कधीही मान्य करणार नाहीत.” सोनिया गांधींचे म्हणणे 100% खरे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या लेखाचे समर्थन करताना वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. “2014 पासून गेल्या 12 वर्षांत सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून देशातील सर्व भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात घेतले गेले आणि विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न झाला, हे सोनिया गांधींचे म्हणणे अगदी खरे आहे. धर्म आणि जातींमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजणे हाच यांचा धर्म आहे. पण 2029 मध्ये जेव्हा देशात सत्ताबदल होईल, तेव्हा संविधान मोडून लोकशाहीचा घात करणाऱ्या एक-एकाचा हिशोब आमचे नेते नक्की करतील.” आणीबाणीवर बोलण्याआधी इतिहास वाचा “भाजपवाले 1975 च्या आणीबाणीची आठवण करून देतात; पण त्यावेळी रेल्वेमंत्र्यांची हत्या झाली होती आणि देशात अराजकता माजली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत जनतेने इंदिरा गांधींना पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून दिले होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यालाच नकार दिला होता आणि बहुजन-आदिवासींच्या मतदानाच्या अधिकाराला विरोध केला होता, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये,” असा सणसणीत टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. ———————————————————– हेही वाचा… भाजपला लोकसभेत 36 खासदार कमी म्हणून विलीनीकरणाच्या अफवा: संजय राऊत म्हणाले- अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांचा आता कोणताही मानसन्मान राहिलेला नाही “अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांचा आता कोणताही मानसन्मान राहिलेला नाही. पक्षात कोणी कितीही मोठ्या पदावर असले तरी पक्षाची सर्व सूत्रे आता पार्थ पवार यांच्याकडेच आहेत; त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या वरिष्ठ नेत्यांना आता पार्थ पवारांच्या हाताखालीच काम करावे लागत आहे. स्वतःच्या पक्षात प्रचंड अडचणीत आल्यामुळेच हे नेते आता विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत. मात्र, केवळ तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून आदरणीय शरद पवार साहेब भाजपसोबत जातील, असे कदापि होणार नाही,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *